Download App

कबड्डीत वादाची ठिणगी! अजितदादा समर्थक बाबुराव चांदेरेंवर शिवसेना खासदाराचे गंभीर आरोप

मुंबई : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे नेते बाबुराव चांदेरे यांच्याकडून खेळाडूंवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे, असा आरोप असोसिएशनचे कार्याध्यक्ष आणि शिवसेना (Shivsena) खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी केला आहे. तसेच चांदेरे यांना बडतर्फ करावे अशीही मागणी कीर्तिकर यांनी असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. कीर्तिकर यांनी पवार यांना लिहिलेल्या पत्रात चांदेरे यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. (Maharashtra State Kabaddi Association Working President Gajanan Kirtikar has made serious allegations against the Sarkaryawah Baburao Chandere)

गजानन कीर्तिकर यांनी पत्रात काय म्हंटले?

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने दिनांक २७ ते ३० डिसेंबर २०२२ दरम्यान ७० वी वरिष्ठ पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद निवडचाचणी कबड्डी स्पर्धा अहमदनगर येथे आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेतून महाराष्ट्र राज्याचा २० महिलांचा प्राथमिक संघ निवड समिती सदस्यांमार्फत निवडण्यात आला होता.

महिला खेळाडूंचे शिबिर सध्या ठाणे येथे सुरु असून त्यात महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह श्री. बाबुराव चांदेरे यांच्याकडून खेळाडूंवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे. राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत निवड झालेल्या काही खेळाडूंना जाणीवपूर्वक शिबिरासाठी निमंत्रित केले गेले नाही. तसेच ज्या महिला खेळाडू राज्य अजिंक्यपद स्पर्धा खेळल्या देखील नाहीत अशा खेळाडूंना मात्र शिबिरासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांना भुलविणाऱ्या UPSC कोचिंग इस्टिट्यूट्सचा बाजार उठणार

उपरोक्त स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या पुणे महिला संघाच्या खेळाडू अंकिता जगताप, पूजा शेलार, समृद्धी कोळेकर, पालघर संघाची खेळाडू पूजा पाटील, रत्नागिरी संघाची खेळाडू सिद्धी चाळके, मुंबई उपनगर संघाची सायली जाधव, धुळे संघाची खेळाडू ऋतुजा बोदिवडेकर आणि मुंबई शहर संघाची खेळाडू प्रतीक्षा तांडेल या खेळाडूंना शिबिरात श्री. चांदेरे यांनी सहभागी होण्यापासून रोखले आहे. यापैकी अंकिता जगताप ही खेळाडू आगामीकाळात छत्रपती पुरस्कारासाठी पात्र ठरू शकते.

राज्य अजिंक्यपद निवडचाचणीमध्ये निवड झालेल्या खेळाडूंना डावलणे आणि निवड चाचणी न खेळलेल्या खेळाडूंना शिबिरासाठी निमंत्रित करणे म्हणजे निवड चाचणी स्पर्धा आयोजन आणि राज्य कबड्डी असोसिएशनची कार्यप्रणाली यांनाच आव्हान आहे. शिबिरासाठी खेळाडूंना बोलाविताना निवड समिती सदस्यांना देखील विश्वासात घेतले नसल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

राजस्थानात PM मोदींचा ‘गॅरेंटर’ कोण होणार : CM पदासाठी तब्बल 9 जणांमध्ये रस्सीखेच

उपरोक्त बाब अतिशय गंभीर असून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची बदनामी करणारी तर आहेच शिवाय श्री. चांदेरे यांच्या बेमुवर्तखोर वर्तनामुळे खेळाडूंचे व्यक्तिगत नुकसान करणारी आणि महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने अपमानजनक आहे.

कृपया याप्रकरणी आपण व्यक्तीशः लक्ष घालून निवड समिती सदस्यांची तातडीने बैठक घ्यावी, सध्या सुरु असलेले शिबीर तात्काळ स्थगित करून राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत निवड झालेल्या कबड्डी खेळाडूंना निमंत्रित करून पुन्हा शिबिराचे आयोजन करावे आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनमध्ये वारंवार मनमानी कारभार करून खेळाडूंचे नुकसान करू पाहणाऱ्या सरकार्यवाह श्री. बाबुराव चांदेरे यांना बडतर्फ करावे, ही आग्रहाची विनंती.

Tags

follow us