Download App

वसंत मोरे यांचा पोपट झालाय.. पण ते मान्य करेनात!

  • Written By: Last Updated:

वर्धा येथील कराळे (Nitesh Karale) गुरूजी माहिती आहेत का? होय ते स्वतःला रिल स्टार समजतात आणि त्याच आधारावर शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून (NCP) उमेदवारी मागत आहेत. आपल्या व्हिडीओला लाखो व्यूव्हज मिळतात. मी प्रसिद्ध आहे, लोक माझे विचार ऐकतात या आधारावर ते स्वतःला नेते समजू लागले आहेत. तसाच प्रकार पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांच्याबाबत तर घडला नाही ना? आपल्या प्रत्येक कृतीचे लाईव्ह प्रात्यक्षिक सोशल मिडियावर करत वसंत मोरे यांना गेल्या काही वर्षांत प्रसिद्धी पावलेली आहे. अन्यायग्रस्तांच्या मदतीला धावणारे म्हणून त्यांनी ख्याती मिळवली. बळकावलेलं कोणी घर सोडत नाही, महिलांवर अन्याय करतयं, अशांना थेट धडा शिकविणारे म्हणून मोरेंना लाखो लाईक्स मिळाले. त्यांच्या मतानुसार चुकीचे काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांच्या गाड्या हातोड्याने फोडण्याची कलाही त्यांनी हस्तगत केली. त्यामुळे त्यांचा हातोडा देखील प्रसिद्ध झाला. (Mahavikas Aghadi has announced the candidature of Ravindra Dhangekar of Congress after leaving Vasant More)

अनेकांच्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या मोरे यांच्या मनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली. त्यातून त्यांनी मनसे सोडत असल्याची घोषणा त्यांच्या पद्धतीने केली. राज ठाकरे यांच्या फोटोला साष्टांग दंडवत घालत असल्याचा फोटो त्यांनी सोशल मिडियात टाकत मनसे सोडण्याची घोषणा त्यांनी केली आणि तेथेच त्यांचा पोपट झाला. राजकारणात प्लॅन बी तयार असल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलले जात नाही. पण आपण सोशल मिडिया स्टार असल्याचा मोरे यांचा ठाम दावा असल्याने काॅंग्रेस असो की राष्ट्रवादी किंवा शिवसेना हे आपले पायघड्या घालून स्वागत करतील, अशी आशा त्यांना होती. पण राजकारण एवढे सोपे नसते.  बरे मोरे यांना फक्त दुसऱ्या पक्षात प्रवेश करायचा नव्हता तर त्यांना थेट लोकसभेची उमेदवारी हवी होती. त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले.

मोरे यांचे काय चुकले?

पक्षाशी फटकून वागणे :

मोरे यांना राज ठाकरे यांनी मनसेचे शहराध्यक्ष म्हणून नेमले. त्यावेळी अनेकांना मोरे हे पक्षाचा पुण्यात विस्तार करतील आणि चांगले दिवस आणतील, अशी आशा होती. पण मोरे हे पडले सोशल मिडिया स्टार. हा स्टार आपल्याला जे आवडते तेच करतो. राज यांनी मशिदीवरील भोंग्याच्या विरोधात भूमिका घेतली. त्यासाठी त्यांनी दोन-चार भाषणे ठोकली. पण त्यांच्याच पक्षाचे शहराध्यक्ष असलेल्या मोरे यांनी आपल्याला पक्षाचे हे धोरण मान्य नसल्याचे जाहीरपणे सांगितले. कोणत्याही पक्षात अशी बेशिस्त खपवून घेतली जात नाही. राज यांनी तातडीने लगेच त्यांची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली. तेथून मोरे हे नाराज झाले. राज हे एवढ्यावरच थांबले नाहीतर तर मोरे यांचे जवळचे मित्र असलेल्या साईनाथ बाबर यांना पुणे शहराध्यक्ष म्हणून नेमले. बाबर हे आपले मित्र असल्याने ते हे पद स्वीकारणार नाहीत, अशी आशा मोरे यांना होती. पण बाबर यांनी पक्षाचा आदेश मानत हे पद स्वीकारले. येथे मोरे यांच्या जखमेवरच मीठ चोळले गेले. तेव्हापासून मोरे हे पक्षापासून फटकून वागू लागले.

धंगेकरांनी निवडणुकीपूर्वीच जिंकला पहिला डाव… शिंदे-फडणवीस अन् अजितदादांवरही पडले भारी!

दुसऱ्या पक्षाशी वाटाघाटी करण्याआधीच मनसे सोडली

मोरे यांचा पुढचा राजकीय प्लॅन काय आहे, याबाबत त्यांच्याच मनात संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. तसे असते तर कोणत्याही पक्षात  जाण्याचा निर्णय न घेता त्यांनी मनसेचा त्याग केला नसता. एखाद्या कसलेल्या नेत्याप्रमाणे वर्तन न करता आधीच मनसेचा राजीनामा दिला आणि मग इतर पक्षांच्या नेत्यांना भेटण्यास सुरवात केली. राजकारणात तुम्हाला जेव्हा गरज असते तेव्हा लोक सहकार्य करत नाहीत, ही साधी बाब मोरे यांच्या लक्षात आली नाही. मोरे यांना जेव्हा दुसऱ्या पक्षांची निमंत्रणे येत होती, तेव्हा त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनीही त्यांना शिवसेनेत येण्यासाठी फोन केला होता. पण ज्या क्षणी मनसे सोडली, तेव्हा मोरे यांचे मूल्य कमी झाले. त्याचाच फायदा इतर पक्ष उठवत आहेत. मोरे यांच्या अटी हे पक्ष मान्य करायला आता तयार नाहीत.

मोरे यांच्या मनात नक्की काय?

मोरे यांनी आपल्याला पुणे लोकसभेची निवडणूक लढवायची आहे, असा आग्रह धरूनच महाविकास आघाडीतील इतर पक्षांकडे चकरा मारत होते. प्रत्यक्षात काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली. ऐनवेळी मोरे यांना उमेदवारी देण्याचे धाडस काॅंग्रेस दाखवेल, असे त्यांना का वाटले असावे? मोरे यांचा प्रभाव असलेला कात्रज परिसर हा संपूर्णपणे पुणे लोकसभा मतदारसंघात येत नाही. तरीही त्यांचा पुण्यातून उमेदवारी मागण्याचा हट्ट अनेकांच्या आकलनापलीकडचा आहे. त्यांनी तरीही पुण्यात अपक्ष निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. यातून मोरे यांना काय साध्य होणार, याचे उत्तर त्यांनाच माहिती असेल.

..तर तुम्हाला गिरीश बापटांच्या फोटोसमोर अश्रू ढाळावे लागतील; गोऱ्हेंनी धंगेकरांना सुनावलं

विधानसभेची गणिते कशी असणार?

वसंत मोरे यांना विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा देखील असू शकते. त्यांनी 2019 मध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यांना सुमारे 35 हजार मते पडली होती. त्याचा फटका भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांना बसला होता. त्यांना पुन्हा विधानसभा निवडणूक लढवायची असेल तर त्यांच्याकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उबाठा) आणि काॅंग्रेस असे तीन पर्याय आहेत. पण यातील तीनही पक्षांकडे सध्या सक्षम पर्याय येथे आहेत. मग मोरे यांना कशी संधी मिळणार? त्यांच्याकडे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचाही पर्याय असू शकतो. पण तेथेही महाविकास आघाडीकडे किंवा महायुतीकडे अनेक चेहरे आहेत. मोरे यांचे नशीब साथ देणारे असेल तर त्यांना खडकवासला किंवा हडपसरमध्ये संधी मिळू  शकते. पण त्यासाठी आतापासूनच अटी घालण्यास त्यांनी सुरवात केल्याने इतर पक्ष त्यांचे स्वागत करताना दिसत नाहीत. आधी लोकसभेला मदत करा, मग पुढचे पाहू असेच मोरे यांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याच पक्षात त्यांना प्रवेश करता आलेला नाही. दुसरीकडे ते आपला मनसे पक्षाचा त्याग करून बसले आहेत.

थोडक्यात सध्या मोरे यांचा पोपट झाला आहे. पण त्यांना ते मान्य नसेल.

follow us