पुणे : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत आज (24 ऑक्टोबर) संपत आहे. रात्रीपर्यंत आरक्षणाचा निर्णय न झाल्यास उद्यापासून तीव्र आमरण उपोषण करण्याचा आणि मंंत्र्यांना गावबंदी जाहीर करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, जरांगे पाटलांच्या संपत आलेल्या या अल्टिमेटमची पहिली झळ आज पुण्यात शरद पवार यांना बसली. पुणे दौऱ्यावर असताना आज मराठा आरक्षण आंदोलकांकडून शरद पवार यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वातील युवा संघर्ष यात्रेची आशीर्वाद सभा आयोजित टिळक स्मारक येथे आयोजित करण्यात आली होती. हा कार्यक्रम घरी जात असताना अलका चौक येथे शरद पवारांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी बोलताना संतप्त आंदोलक म्हणाले की आम्ही मराठा आरक्षणासाठी शरद पवार यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी आंदोलकांनी शरद पवार गो बॅक, शरद पवार यांना मराठ्यांची अॅलर्जी का? अशा घोषणा दिल्या. सोबतच राज्य सरकारने निर्णय घेतला नाही तर उद्यापासून मंत्र्यांचे देखील ताफे अडविण्यात येणार आहेत, असा इशाराही दिला.
मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सरकारकडे सायंकाळपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिल्याची घोषणा करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी सायंकाळपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा करुन आपली प्रतिमा खरी करुन दाखवावी. अन्यथा त्यांनीही मराठा समाजाबरोबर दगाफटका केल्याचा संदेश जाईल.
आम्ही सरकारला सायंकाळपर्यंतचा वेळ दिला आहे. सरकारने दिलेल्या मुदतीमध्येच आरक्षणाचा निर्णय जाहीर करावा. त्यानंतर सरकारने आमच्या दारात आरक्षण घेऊनच यायचं नाही तर त्यांनी आमच्या दारात येऊच नये, असा थेट इशाराही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आल्याची माहिती आहे, पण सरकार जर आरक्षण देणार असेल तरच त्यांच्याशी चर्चा करु, अन्यथा चर्चा करणार नसल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.