Download App

Amol Mitkari हे काय बोलले? धंगेकरांना वाऱ्यावर सोडून काँग्रेस नेते रायपूरला

  • Written By: Last Updated:

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीतील प्रचार काल संध्याकाळी संपला. दोन्ही ठिकाणी उद्या मतदान होणार आहे. पण मतदानापूर्वी अनेक लोकांकडून राजकीय अंदाज बांधले जात आहेत. कोणत्या मतदारसंघात कोण जिंकेल ? किती मतांनी जिंकेल याची चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील आपला राजकीय अंदाज व्यक्त केला आहे. आपल्या अंदाजामध्ये मिटकरी यांनी अजित पवार यांच्या नियोजनाचे कौतुक केले आहे पण काँग्रेस नेत्यांना मात्र घरचा आहेर दिला आहे.  अमोल मिटकरी दोन्ही मतदारसंघासाठी यांनी स्वतंत्रपणे मते मांडली आहेत.

पिंपरीमध्ये अजितदादांच्या कामाची पुण्याई

अमोल मिटकरी लिहितात की, “पिंपरी चिंचवड निवडणुकीच्या प्रचारार्थ तीन ते चार दिवस पिंपरी-चिंचवड शहरात होतो. यादरम्यान आदरणीय अजित दादांनी देशातील दहा सुंदर शहरांमध्ये उभे केलेले पिंपरी चिंचवड शहर पाहिले. मागील काही वर्षात भाजपच्या सत्तेनंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा बनली. आदरणीय दादांनी केलेले कार्य जनतेच्या मनात ठासून भरलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत नाना काटे यांचा विजय जवळपास निश्चित आहे.तरीही जाणकारांच्या मते आज आणि उद्या दोन दिवसात भारतीय जनता पार्टी कडून पैशाचा महापुर होत झाला तर काटेना निवडणुक त्रासदायक होऊ शकेल.

आगामी दोन दिवस लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे दिसते. अजित दादांनी ज्या पद्धतीने या निवडणुकीत नियोजन केले ते वाखाणण्यासारखे आहे. अजित दादांनी केलेल्या कामाची पुण्याई आणि सर्व समाजाला धरून चालणारे उमेदवार नाना काटे, दादांची प्रचंड प्रचंड मेहनत हीच विजयाची जमेची बाजू असेल.

हेही वाचा : रवींद्र धंगेकरांना बुद्धी द्या : भाजपची दगडूशेठ गणपतीला आरती…

धंगेकरांना काँग्रेसचीच साथ नाही

कसबा पोटनिवडणुकीवर अमोल मिटकरी लिहतात, “कसब्याची निवडणूक भाजप विरुद्ध धंगेकर अशी झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केवळ आणि केवळ अंतर्गत कलहामुळे(काही अपवाद वगळता) फारसे सक्रिय दिसले नाहीत हे वास्तव आहे. आज आणि उद्या दोन दिवस महत्त्वाचे असताना सर्व ज्येष्ठ नेते रायपूरकडे निघून गेले. धंगेकरानी काँग्रेसच्या बाजूने भक्कम वातावरण निर्माण केले आहे. अजित दादा ,बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे आदीं नेत्यांनी या मतदारसंघात स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे .राष्ट्रवादी आणि शिवसेना संपूर्ण क्षमतेने काँग्रेसला सहकार्य करित आहेत. दुसरीकडे मात्र केवळ अंतर्गत कलहामुळे धंगेकर एकटे पडत असतील तर भाजपला आयते कोलीत मिळाले असे समजा.

कुठल्याही परिस्थितीत उद्या जास्तीत जास्त लोकांनी मतदान केले पाहिजे. यासाठी काँग्रेसने आतापासून अत्यंत सक्रिय होणे महत्त्वाचे आहे. अपयश आले तर ह्या निवडणुका लोकशाही मधल्या शेवटच्या निवडणुका ठरतील. ज्याप्रमाणे अजित दादांनी पिंपरी चिंचवड आणि कसबा दोन्ही निवडणुका गांभीर्याने घेतल्या तश्याच अन्य नेत्यांनीही केवळ एक दिवस उद्यासाठी गांभीर्याने घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे मनापासून वाटते.

दोन्ही मतदार संघाच्या आपल्या अंदाजावर शेवटी मिटकरी यांनी म्हटले आहे की, “मला जास्त राजकीय अनुभव नसला तरी माझे वैयक्तिक मत येथे नोंदवतो आहे.” त्यामुळे दोन्ही ठिकाणी उद्या मतदान आहे, पुढील आठवड्यात निकाल लागेल. त्यामुळे तेव्हा कळेल, नक्की कोणाचा अंदाज खरा ठरला.

Tags

follow us