Surendra Pathare Joins BJP : राज्यात 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होताच जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. अनेक नेते आता एकापक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहे. यातच आज पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून अनेक दिग्गज नेत्यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांचा देखील समावेश असल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
या पक्षप्रवेश कार्यक्रमादरम्यान बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून सुरेंद्र पठारे (Surendra Pathare) वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघात युवकाचे संघटन करत आहे. सुरेंद्र पठारे गेल्या काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये होते. तर आता त्यांनी पुन्हा एकदा आपल्या सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो असं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले.
सुरेंद्र पठारेंचा भाजप प्रवेश का ?
विधानसभा निवडणूक 2024 साठी वडगाव शेरी मतदार संघातून बापू पठारे (Bapusaheb Pathare) यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली होती मात्र महायुतीमध्ये ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्याने बापू पठारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत विधानसभा लढवली आणि जिंकली. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत बापू पठारे आणि सुरेंद्र पठारे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जोरदार प्रचार करत वडगाव शेरीमधून मताधिक्य मिळून दिले होते. पठारे कुटुंबियांची भाजपची आपली जुनी नाळ अधिक घट्ट करण्यासाठी सुरेंद्र पठारे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला असल्याची चर्चा पुण्याच्या राजकारणात सुरु आहे. तर दुसरीकडे वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
Payal Gaming डीपफेक व्हिडिओ प्रकरणात गुन्हा दाखल; व्हिडिओची होणार फॉरेन्सिक चौकशी
सुरेंद्र पठारे यांच्यासह तब्बल 22 नेत्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश
आज केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये तब्बल 22 नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील काही दिग्गजांचा देखील समावेश आहे. वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे, माजी नगरसेविका रोहिणी चिकटे, माजी नगरसेवक सचिन दोडके, माजी नगरसेवक बाळासाहेब धनकवडे, सायली रमेश वांजळे, विकास दांगट, नारायण गलांडे, माजी मंत्री वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव कणव चव्हाण, खंडू लोंढे, पायल तुपे, प्रतिभा चोरगे, शुभांगी ढोले, संतोष मते, प्रशांत तुपे, विराज तुपे, अनिल तुपे, इंदिरा तुपे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे मुळशीमधील भानुदास पानसरे, गणेश पानसरे, संतोष पानसरे, कृष्णकुमार पानसरे, आनंद माझिरे, सुहास पानसरे, किरण साठे आणि सचिन पानसरे यांचा समावेश आहे.
