‘भाजप-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’; शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुती म्हणूनच लढतील, शिवसेनेशी प्राथमिक चर्चा.
BJP-Shiv Sena-RPI alliance sealed in Pune : ‘राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुती म्हणूनच लढतील,असा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतला आहे. त्यानुसार पुण्यात आम्ही युती म्हणून एकत्र लढू. गुरुवारी शिवसेनेशी(Shivsena) प्राथमिक चर्चा झाली. पुढील टप्प्यात आणखी बैठका घेऊन युतीला अंतिम स्वरूप दिले जाईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे जिल्हा निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ(Muralidhar Mohol) यांनी दिली.
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी झाली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ‘राज्यात महायुतीचे सरकार आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमताने राज्यातील महापालिका निवडणुका युती म्हणून लढवायचे ठरवले आहे. त्यानुसार पुण्यात भाजप आणि शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये गुरुवारी सकारात्मक चर्चा झाली. ही प्राथमिक चर्चा होती. त्यात निश्चित काही प्रभाग, आकडे आणि जागांबाबततही चर्चा झाली. मात्र, यापुढेही आमच्या काही बैठका होतील, त्यात याला अंतिम स्वरूप दिले जाईल,’असे मोहोळ म्हणाले. ‘दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सर्वांना संधी मिळणे अवघड आहे. इच्छुक असण्यातही काही गैर नाही. आम्ही एकत्रित लढणार आहोत. दरम्यान या बैठकीला शिवसेनेचे रवींद्र धंगेकर उपस्थित नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. रवींद्र धंगेकर हे बैठकीला का उपस्थित नाही असा प्रश्न केंद्रीय मंत्री मोहोळ यांना विचारला असता, त्याबद्दल त्यांनाच विचारा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
त्यामुळे कुठेही बंडखोरी होईल, अशी शक्यता नाही. भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. लोकशाही पद्धतीने आम्ही इच्छुकांकडून अर्ज मागवले, मुलाखती घेतल्या. त्यापुढील निर्णय कोअर कमिटी आणि पक्ष नेतृत्व घेईल,’असेही मोहोळ यांनी नमूद केले. ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाही (आठवले) आमच्यासोबत आहे. काही दिवसांपूर्वीच माझी व रामदास आठवलेंची दिल्लीत भेट झाली. लवकरच आरपीआय व आमची बैठक होईल. आमची युतीही कायम राहील,’असेही मोहोळ म्हणाले.
निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. इतर पक्षातून इच्छुक असलेल्यांपैकी कोणाला घ्यायचे कोणाला नाही, हा पक्षाचा निर्णय आहे. तूर्तास तरी कोणाचाही प्रवेश होणार नाही. पक्षात प्रवेश दिल्यानंतर तो भाजपचा कार्यकर्ता होतो. पण उमेदवारी देताना निवडून येण्याची क्षमताही पडताळली जाते. पक्ष नेतृत्व घेईल, तो निर्णय आम्हाला मान्य असेल.,’असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.
