विश्वासाला तडा जाऊ देणार नाही; कोपरगावच्या विकासासाठी माझी जबाबदारी यापुढेही प्रामाणिकपणे: आमदार आशुतोष काळे
Mla Ashutosh Kale : सर्वांगीण विकासासाठी जो काही निधी आवश्यक असेल, तो निधी राज्य शासनाकडून मंजूर करून आणण्याची जबाबदारी माझी आहे.
Mla Ashutosh Kale : विरोधकांच्या आडमुठ्या धोरणामुळे कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक (Kopergaon NagarPalika Election) लांबली जावून सर्वच पक्षांना पुन्हा प्रचार यंत्रणा उभी करून प्रचार करावा लागला. त्यामुळे कोपरगावकरांना निश्चितपणे त्रास झाला तो त्रास कोपरगावकर मतदानातून व्यक्त करणार असले तरी कोपरगावकरांवर होत असलेल्या प्रचाराच्या भडीमारातून दिलासा देण्यासाठी आमदार आशुतोष काळे (Mla Ashutosh Kale) यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या प्रचारार्थ बुधवारी तहसील कार्यालयाच्या मैदानावर ‘महाराष्ट्राचा हास्यविनोद संगीत कार्यक्रम’ आयोजित केला होता. या कार्यक्रमाला कोपरगावकरांनी प्रचंड गर्दी केली होती.
याप्रसंगी कोपरगावकरांशी आ.आशुतोष काळे यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघातील जनतेने मला दुसऱ्यांदा तब्बल सव्वा लाख मतांच्या ऐतिहासिक मताधिक्याने निवडून देवून पुन्हा सेवा करण्याची संधी दिली. मला दिलेली संधी हि मी केलेल्या विकास कामांवर, माझ्या प्रामाणिकपणावर आणि विकासाभिमुख दृष्टीकोनावर जनतेने ठेवलेला विश्वास आहे. या विश्वासाला तडा जाऊ न देता, कोपरगावच्या विकासासाठी माझी जबाबदारी यापुढेही प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडणार आहे.
कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जो काही निधी आवश्यक असेल, तो निधी राज्य शासनाकडून मंजूर करून आणण्याची जबाबदारी माझी आहे. मी निवडून आल्यापासून कोट्यावधींचा निधी कोपरगावाच्या विकासकामांसाठी आणला आहे. पुढील काळातही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि इतर मूलभूत सुविधांसाठी भरघोस निधी आणून विकासकामांना गती द्यायची आहे. विकास कामांना निधी मिळविणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच तो निधी योग्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने वेळेत खर्च होणेही तितकेच गरजेचे आहे. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षाचे विकासदृष्टी असलेले नगराध्यक्ष आणि नगरसेवक असतील. नगरपालिकेतील सत्तेचा उपयोग जर विकासासाठी करायचा असेल, तर ती सत्ता राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाचीच असणे अत्यंत आवश्यक आहे.
विरोधकांनी नेहमीच चांगल्या कामात खोडा घालण्याची आणि विकासाला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. नगरपालिकेमध्ये विकासकामांच्या विरोधात ठराव मंजूर करणे, सुरू असलेल्या कामांवर न्यायालयीन स्थगिती आणणे, केवळ राजकीय द्वेषातून शहराच्या प्रगतीला अडथळे निर्माण करणे ही त्यांची नेहमीची वृत्ती राहिली आहे. अशा नकारात्मक राजकारणामुळे कोपरगावच्या विकासाला मोठा फटका बसलेला कोपरगावकरांनी पाहिला आहे. नगरपालिकेची सत्ता कोपरगावकरांना अपेक्षित असलेला विकास करण्यासाठी मागत आहे. त्यासाठी नगराध्यक्षपदाची उमेदवारी माझ्या घरातील व्यक्तीला नव्हे तर समाजाशी एकरूप असलेल्या काकासाहेब कोयटे यांना दिली आहे. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर व्हाव्यात, रखडलेली कामे मार्गी लागावीत, नवीन विकासकामांना चालना मिळावी आणि कोपरगावचा सर्वांगीण विकास व्हावा, हीच माझी भूमिका आहे. त्यामुळे सर्वांगीण शहराच्या विकासासाठी नगरपालिकेची एकहाती सत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेसला द्या. कोपरगावला विकासाच्या नव्या उंचीवर घेवून जाण्यासाठी आपले सहकार्य मला आवश्यक असून कोपरगावच्या सुज्ञ मतदारांनी राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना बहुमताने विजयी करावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या कोपरगावकरांना केले.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे म्हणाले की, काम करत आलोय आणि काम करत राहणार या विचाराने कला संस्कृतीला जोपासणारी आणि प्रोत्साहन देणारी कोपरगाव हि कलेची पंढरी आ.आशुतोष काळेंच्या नेतृत्वात विकसित होत आहे. विकासाचा रथ अविरतपणे सुरु ठेवण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध असून पहिल्या शंभर दिवसांत काय करायचे, पहिल्या एका वर्षात, पुढील तीन व पाच वर्षांच्या टप्प्यात काय करायचे याचा कालबध्द कार्यक्रम आ.आशुतोष दादांनी आम्हाला ठरवून दिलेला आहे. पहिल्या शंभर दिवसात आम्ही मोकाट कुत्र्यांचा आणि विकासकामात खोडा घालणाऱ्या विरोधकांचा बंदोबस्त करणार आहे.
विरोधी गटाचे नाव खोडा पार्टी
आ.आशुतोष काळे कोपरगाव शहरात करीत असलेल्या विकास कामांमध्ये नेहमीच खोडा घालण्याचे काम केल्यामुळे विरोधी गटाचे नाव आपण खोडा पार्टी ठेवले आहे. पुढच्या दोन वर्षात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह आम्ही उभारणार आहोत. आमच्याकडे कोपरगावच्या विकासाचे व्हिजन असून स्वच्छ, सुरक्षित आणि स्मार्ट कोपरगाव हा आमचा ध्यास आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पाठबळावर आणि आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगावच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्ण करणार आहे. आमच्या विकास व्हिजनमध्ये शहरातील एकही घटक विकासापासून वंचित राहणार नाही याची आम्ही काळजी घेवू.
प्रत्येक प्रभागात उद्यान, तीन प्रभाग मिळून एक उद्योग मंदिर उभारून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. कोपरगाव शहराच्या बाहेर गेलेले क्रीडांगण पुन्हा शहरात आणणे, तसेच आरोग्य, शिक्षण आणि कलाक्षेत्र समृद्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या सर्व विकासकामांसाठी आवश्यक निधी उभारणी व मार्गदर्शन आ.आशुतोष काळे यांच्या माध्यमातून मिळणार असल्याने राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांना आणि मला नगराध्यक्ष म्हणून निवडून द्या असे आवाहन काका कोयटे यांनी उपस्थित जनसागराला केले.
कलाकारांना कोपरगावकरांना खळखळून हसविले !
महाराष्ट्राचा हास्यविनोद संगीत कार्यक्रमात विनोदी कलाकार भाऊ कदम, कुशल बद्रिके, प्रसाद खांडेकर व ओंकार राऊत यांनी कोपरगावकरांना खळखळून हसवले. तसेच महाराष्ट्राचा रॉकस्टार गायक रोहित राऊत व गायिका राधिका भिडे यांनी आपल्या जादुई आवाजाने कोपरगावकरांना मंत्रमुग्ध केले.याप्रसंगी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या मा.संचालिका सौ. चैतालीताई काळे, विविध क्षेत्रांतील मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक पदाचे उमेदवार, कार्यकर्ते व कोपरगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोयटे यांना मतदार मोठ्या मताधिक्याने निवडून देतील-गिरीजा ओक
कोपरगावच्या पाण्याचा प्रश्न सोडवून महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवून आ. आशुतोष काळे यांनी महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान केला आहे. कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती बघून कोपरगावच्या सर्वच महिलांचे आशीर्वाद आ.आशुतोष काळे यांच्या पाठीशी असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी कोपरगावकरांच्या सेवेसाठी समाजाच्या अडीअडचणीच्या वेळी धावून जाणारे काकासाहेब कोयटे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे.त्यांचे सामाजिक काम खूप मोठे आहे त्यामुळे समाज नेहमीच अशा व्यक्तींच्या पाठीशी असतो त्यामुळे काकासाहेब कोयटे व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांना कोपरगावचे सुज्ञ मतदार मोठ्या मताधिक्याने निवडून देतील, असे अभिनेत्री गिरीजा ओक यांनी म्हटले आहे.
आशुतोष काळेंचे कोपरगावकरांसाठी भावनिक पत्र
आजच्या ई-मेलच्या जमान्यात पत्र मागे पडली आहेत. तरीही पत्रव्यवहाराची जादू काही औरच असते हे चला हवा येवू द्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून अष्टपैलू अभिनेते सागर कारंडे यांनी पोस्टमनच्या भूमिकेतून आपल्या अनोख्या पत्र वाचण्याच्या शैलीतून दाखवून दिले आहे. याही कार्यक्रमात अभिनेते सागर कारंडे यांनी एका कोपरगावाकराने आ.आशुतोष काळे यांना पाठवलेले पत्र वाचून दाखवत कोपरगावकरांना भावनिक करून ई-मेलच्या संवादापेक्षा हातानं लिहिलेल्या पत्रातल्या भावना किती जवळच्या असतात हे पुन्हा एकदा यानिमित्ताने दिसून आले.
