इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम; राज्यात गॅस टंचाईची भीती, वितरकांना पोलीस संरक्षण
अन्न व नागरी पुरवठा विभागाने गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांना तसेच गॅस एजन्सींनाही पोलीस संरक्षण देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Instructions to provide police protection to gas distributors : इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर इंधन टंचाईची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतातही काही ठिकाणी एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्याचे चित्र समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नेहमी सहज मिळणारा घरगुती एलपीजी सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये, विशेषतः पुण्यात, गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने जिल्हा प्रशासनाला गॅस वितरकांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. काही ठिकाणी गॅस वितरकांवर हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्याने वितरण व्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांना तसेच गॅस एजन्सींनाही पोलीस संरक्षण देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अन्न व नागरी पुरवठा विभागाने यासंदर्भात अधिकृत परिपत्रक जारी केले असून गॅसचा पुरवठा पूर्वस्थितीत येईपर्यंत ही व्यवस्था कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय गॅस पुरवठा सुरळीत राहावा यासाठी जिल्हास्तरावर विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत राहणार असून त्यात पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त सदस्य-सचिव म्हणून काम पाहणार आहेत. पुरवठा व्यवस्थेवर लक्ष ठेवणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि वितरण प्रक्रिया सुरळीत ठेवणे ही या समितीची जबाबदारी असेल.
महाराष्ट्र साहित्य परिषदेत सत्ताबदल, योगेश सोमण यांच्या नेतृत्वाखाली नवी कार्यकारणी
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात गॅस टंचाई नसल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊन गॅस सिलेंडरची साठवणूक करू नये आणि गॅस एजन्सीबाहेर अनावश्यक रांगा लावू नयेत, असे आवाहन त्यांनी केले होते. केंद्र सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा नियमितपणे केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.
मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनानंतरही पुण्यातील काही भागांमध्ये नागरिकांनी गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी सकाळपासूनच गॅस एजन्सीबाहेर मोठ्या रांगा लावल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थितीबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंता कायम असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन करताना काही राजकीय पक्ष जाणीवपूर्वक भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोपही केला आहे. अशी भीती पसरल्यास लोक मोठ्या प्रमाणावर गॅस साठवू लागतील आणि त्यामुळे पुरवठा व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकार आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
