पुणे : सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) मीडियावर घसरले. ‘मी सगळ्यांचे ऐकतो. त्याचे योग्य उत्तर देतो. कोणी काही बोलले तर उत्तर दिली पाहिजे असे गोदी मीडिया सांगत असेल आमचे प्रवक्ते उत्तर देतील’, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
तांबे-थोरात प्रकरणी घरातील भांडण अजित पवार (Ajit Pawar) यांनी चव्हाट्यावर आणले.
या वादात आम्हाला पडायचे नाही. महागाई, बेरोजगारी हे प्रश्न महत्वाचे आहेत, असे
नाना पटोले म्हणाले.
तांबे प्रकरणावर उत्तर देताना नाना पटोले यांनी मीडियावर टीका केली. ‘तुमच्या मालकांनी दिलेले प्रश्न विचारू नका. चौथा स्तंभ भाजप झालाय, त्यावर आक्षेप आहे. अनेक नाटकं करून मुख्य प्रश्नावरून लक्ष हटवत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
यानंतर सत्यजीत तांबे यांनी केलेल्या आरोपांवर काँग्रेसकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. पक्षाने योग्यच एबी फॉर्म दिला होता, त्यावर सत्यजीत तांबे यांनी ओके असंही म्हटलं होतं, त्यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत असं काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितलं.
काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, “ते फॉर्म काँग्रेसच्या वतीनं बाळासाहेब थोरात यांच्या ओएसडींना देण्यात आले होते, त्या फॉर्मचा स्क्रिनशॉट पाठवण्यात आला होता. त्यावर सत्यजीत तांबे यांनी ओके असं उत्तरही मोबाईलवरून दिलं होतं”.
”सत्यजित तांबेंनी केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. पक्षाचे प्रश्न पक्ष पातळीवरच सोडवले पाहिजेत. सत्यजित तांबेनी कोणत्याही गोष्टीचं व्यवस्थित उत्तर दिलं नाही.”, असा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे.
दरम्यान, सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नाशिक पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीचे एबी फॉर्म देण्यात आल्याचा गंभीर आरोप सत्यजीत तांबे यांनी केला.
एबी फॉर्म हा मुद्दा लहान-सहान नाही, चुकीचा फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्याचा पक्षाचा डाव होता असा आरोपही सत्यजीत तांबे यांनी केला.