पुणे : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर मराठा हाच उल्लेख आहे. ते मराठाच (Maratha) असून त्यांनी कधीही ओबीसी प्रमाणपत्र घेतले नाही, असा दावा अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष आणि शरद पवार समर्थक विकास पालसकर यांनी केला आहे. ते बारामती येथे बोलत होते. यावेळी शरद पवार यांना बदनाम करण्यासाठी नागपूर येथून रसद पुरविली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. (National President of NCP Sharad Pawar is a Maratha and his school leaving certificate mentions Maratha.)
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मराठ्यांचे नाही तर ओबीसींचे नेते आहेत, तेच मराठा आरक्षणचे मारेकरी आहेत, असा आरोप राजमाता जिजाऊंचे 14 वे वंशज आणि लेखक नामदेव जाधव यांनी केला होता. सोबतच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनीही शरद पवार ओबीसी असल्याचा दावा केला होता. त्यापाठोपाठ मागील काही दिवसांपासून शरद पवार यांचा कथित जातीचा दाखला आणि निवडणूक प्रमाणपत्र व्हायरल केले जात होते.
यातही शरद पवार यांच्या नावापुढे ओबीसी संवर्ग असल्याच दाखवत ते ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र हेच आरोप शरद पवार यांच्या समर्थकांनी खोडून काढले आहेत. विकास पालसकर यांनी व्हायरल होणारा जातीचा दाखला खोटा असल्याचे सांगत पवार यांचा शाळा सोडल्याचा मूळ दाखला दाखवत सर्व अफवांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. तसेच शरद पवार यांनी कधीही ओबीसी प्रमाणपत्र घेतले नसल्याचा दावाही पालसकर यांनी केला.
यावेळी ते म्हणाले, शरद पवार यांचे बारामतीत शिक्षण झाले, एवढ्या मोठ्या नेत्याला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले जाते. या षडयंत्रकारी लोकांना कोणी तरी रसद पुरवत असते. सामाजिक विषय येतो तेव्हा खोलात जाऊन शोधावे लागते. त्यामुळे पवार साहेबांच्या शाळेच्या दाखल्यावर काय लिहिल ते तुम्हीच पाहा. पवार मराठा असल्याचा धडधडती पुरावा आहे. एवढ्या मोठ्या नेत्यांला बदनाम करण्याचं व्हिटॅमिन कुठून येते? नागपूर सेंटरकडूनच हे व्हिटॅमिन पुरवले जात असावे असा आरोपही यावेळी पासलकर यांनी केला आहे.