NCP candidate Vikram Kakade elected unopposed : पुणे विभाग विधान परिषद निवडणुकीत अखेर मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांचे उमेदवार आणि पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. याआधी भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली होती. त्यामुळे निवडणुकीतील सर्व प्रमुख आव्हाने दूर झाल्याने विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
श्रीकांत पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे विभाग विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार होऊ नये, लोकशाही मूल्यांचे रक्षण व्हावे आणि निवडणूक प्रक्रियेची पवित्रता अबाधित राहावी, या व्यापक भूमिकेतून पक्षाने निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या विनंतीला मान देत तसेच शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनानुसार हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुणे निवडणुकीत नवीन ट्विस्ट?
दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर या निवडणुकीबाबत महत्त्वाच्या राजकीय हालचाली सुरू झाल्याची चर्चा होती. त्यानंतर अवघ्या काही तासांत श्रीकांत पाटील यांच्या माघारीची घोषणा झाल्याने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
एकीकडे भाजपचे बंडखोर प्रदीप कंद, राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आणि आता शरद पवार गटाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्याने पुणे विभाग विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे यांचा विजय आता केवळ औपचारिकता राहिला असून या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः अजित पवार आणि शरद पवार गटांमधील संवाद तसेच आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाकडे महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड म्हणून पाहिले जात आहे.
