Download App

पर्यटन समृद्ध अन् सुपरफास्ट पुरंदर; संभाजी झेंडेंचं व्हिजन एकदम क्लिअर..

पुरंदर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचं व्हिजन काय असणार याचा उलगडा संभाजी झेंडे यांनी केला.

Maharashtra Elections : विधानसभा निवडणुकाचं रण तापू लागलं आहे. लवकरच उमेदवारांची नाव निश्चित होतील. प्रचाराच्या काळात मतदारसंघाच्या विकासाची आश्वासनेही दिली जातील. त्यांच्या या व्हिजनची चर्चा आतापासूनच सुरू  झाली आहे. मात्र पुण्यातील पुरंदर मतदारसंंघाची गोष्ट काही वेगळी आहे. एकतर पुणे जिल्ह्यातला तालुका. वाढतं शहरीकरण, अंजीर, ऊस अन् सिताफळाचं आगार. पुण्याजवळ असणाऱ्या तालुक्याच्या वरच्या भागातली वाहतूक कोंडी, रस्त्यांचा प्रश्न, जेजुरीसारखी मोठी तीर्थक्षेत्रं असल्याने भाविकांची दाटी… या सगळ्या गोष्टी सोडविण्याचं व्हिजन माजी प्रशासकीय अधिकारी आणि शरद पवार गटाचे नेते संभाजी झेंडे यांनी बाळगलं आहे. पुरंदरच्या सर्वांगीण विकासाचं त्यांचे व्हिजन नेमकं कसं आहे याचा उलगडा त्यांनी लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत केला.

पुरंदरच्या निवडणुकीचा मुद्दा येईल त्यावेळी तुम्हाला काय वाटतं की मतदारांना काय विचार करावा? तुम्ही मतदारांना काय विश्वास देऊ शकता? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संभाजी झेंडे म्हणाले, ‘सरकारी नोकराला साहेब म्हणण्याचं कल्चर जे ब्रिटीश येथे सोडून गेले ते अजून संपलेलं नाही. जनतेचं काम करणं ही त्यांच्यासाठी दुय्यम गोष्ट झालेली आहे. माझं तसं नाही. आपण जनतेचे सेवक आहोत. आपल्याला जो पगार मिळतो तो जनतेच्या कराच्या पैशांतून मिळतो त्यामुळे आपण त्यांचं देणं लागतो. मी अधिकारी वर्गाला देखील याच गोष्टी नेहमी सांगत आलो आहे.’

पुरंदर मतदारसंघासाठी तुमच्या डोक्यात काय कल्पना आहेत? असे विचारले असता ते म्हणाले, ‘माझे सहकारी भास्करराव मुंडे यांनी नदीजोड प्रकल्प धुळे जिल्ह्यात खूप चांगल्या पद्धतीने राबवला. त्यापद्धतीने आमच्याकडे नालाजोड प्रकल्प राबवून दुष्काळ किमान दोन ते तीन महिने पुढे ढकलता येईल अशी एक कल्पना आहे. तालुक्यातील पाच सहा गावांचा अपवाद वगळता यंदा पावसाचं प्रमाण खूप समाधानकारक राहिलं आहे. आजमितीला आमच्या तालुक्यातलं पाणी वाहून चाललं आहे. हे पाणी अडवून वर आणू शकलो तर मार्चपर्यंत तर पाण्याची काळजी मिटवता येईल.’

“२०१९ मध्ये थांबलो पण, यंदा पुरंदर लढणारच!” शरद पवारांच्या शिलेदाराचा पक्का निर्धार

अन् गडकरी साहेबांनी माझ्यासमोरच सही केली

पुरंदर तालुक्याच्या वरच्या गावात ट्राफिकची फार मोठी समस्या आहे. याबाबतीत तुमच्या काय कल्पना आहेत? असे विचारले असता, ‘हडपसर ते लोणंद असा महामार्ग मंजूर होता. पुरंदरमधील झेंडेवाडी ते लोणंद या रस्त्याचं जवळपास सत्तर टक्के काम पूर्ण होत आलं आहे. त्यातील दिवेघाटाचा पोर्शन होत नव्हता. त्यासाठी मी आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी वनाधिकाऱ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. केंद्र सरकारकडेही पाठपुरावा केला.’

‘गडकरी साहेब, योगायोगाने नागपुरला होते. त्यावेळी ते म्हणाले तुम्ही हे सगळे कागदपत्र घेऊन सांगलीला या म्हणून सांगितले. तेथील चितळे बंधूंच्या गेस्ट हाऊसला बैठक झाली. गडकरी साहेबांची मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांना आम्ही सगळ्या गोष्टी समजून सांगितल्यानंतर त्यांनी तिथूनच दिल्लीला फोन लावले. त्यानंतर मी शरद पवारांच्या लेटरहेडवर मंजुरीचं पत्र घेऊन गेलो होतो त्या पत्रावर गडकरी साहेबांनी तिथेच सही केली. ते काम मार्गी लागलं आणि योगायोगाने तीन दिवसांपूर्वी त्यांनीच या कामाचं उद्घाटन केलं.’

वाहतुकीची कोंडी कमी होणार

‘आता यामुळे आता हडपसर ते दिवेघाटाचे वरचे टोक असा हा चार पदरी रस्ता होणार आहे. मध्ये रस्ता दुभाजक असतील. फुरसुंगीच्या पुढे दोन भागात उड्डाणपूल करण्यात येणार आहे. वडकी, उरळीला अंडरपास देण्यात येणार आहे. त्यामुळे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या बऱ्यापैकी कमी होईल.’ कात्रज, कोंढवा भागातील वाहतुकीच्या समस्येबाबत काही नियोजन आहे का? या प्रश्नावर झेंडे म्हणाले, ‘सासवड ते खडी मशीन चौक तिथपर्यंतच्या रस्त्याचा डीपीआर सरकारच्याही विचाराधीन होता. त्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. ज्या ज्या रस्त्यांचे डीपीआर बनवण्याचे काम सुरू आहे त्यात सासवड ते खडी मशीन चौक या रस्त्याच्या डीपीआरचं काम हाती घेण्यात आलं आहे. नंतर अंदाजपत्रक बनतात. पुढील टप्प्यात सरकारच्या बांधकाम विभागाची मान्यता मिळाल्यानंतर पुढील गोष्टी होतील.’

मोठी घडामोड : यावेळी जास्त कुणी भेटणार नाही; विधानसभेसाठी बारामतीतून अजितदादांचं बॅकआऊट?

पुरंदरच्या पर्यटनाचा रोडमॅप तयार

पुरंदर पर्यटन तालुका म्हणून विकसित करण्याचा काही प्लॅन आहे का? या महत्वाच्या प्रश्नावर झेंडेंनी नियोजन सांगितलं. ते म्हणाले, ‘पुरंदर तालुक्यातील जेजुरी, कानिफनाथांचं मंदिर आणि अन्य मंदिरांत आजही भाविकांची मोठी गर्दी असते. भुलेश्वरला श्रावणाच्या महिन्यात प्रचंड गर्दी असते. मात्र तेथील रोड वनखात्याच्या अडचणीने होत नव्हता. त्यानंतर वनखात्याची परवानगी घेऊन नवनाथ लोखंडे या एका भक्तानेच तो रोड करून दिला. मी स्वतः अनेक ठिकाणी प्रयत्न करून वनखात्याची परवानगी मिळवली. पीएमपीएमलच्या ज्या बस आहेत त्यातील एखादी बस या तीर्थक्षेत्रांच्या चारही मार्गांवर ठेवावी यासाठी प्रयत्न करणार आहे.’

तालु्क्यातल्या अंजीर आणि सिताफळासाठी प्रक्रिया उद्योग उभारू असं बोललं जातं की खरंच त्यावर काही काम सुरू आहे का? असे विचारले असता, माझ्या गावातच आठ ते दहा ठिकाणी लोकांनी प्रक्रिया उद्योग सुरू केले आहेत. यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याचा माल हा नाशवंत असतो. त्यामुळे या मालावर प्रक्रिया करून लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आता शेतकऱ्यांनाच प्रोत्साहन देण्याची गरज आहे.’ सरकारकडूनही तसे प्रयत्न होत असल्याचे संभाजी झेंडे म्हणाले.

follow us