Amol Kolhe vs Ajit Pawar : शिरुर लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या मतदारसंघावर अजितदादांनी दावा ठोकला. त्यानंतर विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना (Amol Kolhe) आव्हान देत नवा पर्याय देणार आणि उमेदवार निवडूनही आणणार असं सांगितलं होतं. इतकंच नाही तर आज सकाळीच अजित पवार मतदारसंघात दाखल झाले. मी काल जे काही सांगितलं तेच फायनल अशा शब्दांत ठणकावलंही. त्यानंतर आता खासदार कोल्हे सुद्धा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. उद्यापासून सुरू होणाऱ्या शेतकरी आक्रोश मोर्चाआधी त्यांनी शरद पवारांची भेट घेत चर्चा केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना सूचक शब्दांत अजितदादांना इशाराही दिला.
अमोल कोल्हे म्हणाले, अजित पवार हे मोठे नेते आहेत. आती ते जी काही टीका करत आहेत पण मी आहे तिथेच आहे. त्याचवेळी त्यांना कान धरण्याचा अधिकार होता त्याचवेळी धरला असता तर सोपं झालं असतं. मी पालकमंत्री म्हणून त्यांचा आभारी आहे. पण, सहा महिन्यांपूर्वीच आम्ही मांजरीच्या उड्डाणपुलाची पाहणी केली आहे. यानंतर आम्ही नागरिकांसाठी हा उड्डाणपूल लवकरात लवकर खुला करावा अशी मागणी अजितदादांकडेच केली होती. आता त्यांनी या उड्डाणपुलाची पाहणी केली म्हटल्यानंतर माझ्या मतदारसंघातील नागरिकांसाठी सोयीचा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे.
त्यानंतर पत्रकारांनी त्यांना अजित पवार यांनी दिलेलं आव्हान स्वीकारणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर कोल्हे म्हणाले, मी एक मध्यमवर्गीय सर्वसामान्य कुटुंबातील आहे. अजितदादांनी मला दिलेलं आव्हान हा मी माझा गौरवच समजतो. ते आमचे नेते होते त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला शोभणार नाही.
बात निकली है तो दूर तक जाएगी
काल पुणे दौऱ्यात अजित पवार यांनी मोठा खुलासा करत कोल्हे दीड वर्षांपूर्वीच खासदारकीचा राजीनामा देणार होते, असे म्हटले होते. यावर कोल्हे यांनी सावध उत्तर दिले. ते म्हणाले, बात निकली है तो दूर तक जाएगी. पण मी त्यांचा नेहमीच आदर करत आलो आहे. त्यामुळे यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. दादांनीही नेहमीच माझं कौतुक केलं आहे. त्यामुळे त्यांनी आता एक विधान विरोधात केलं म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणं योग्य ठरणार नाही.
दादांचा दरारा सर्वांनाच ठाऊक, केंद्रात दरारा दाखवून कांदा निर्यातबंदी उठवा
अजितदादांना मी विनंती करतो की आता त्यांनी ठामपणे केंद्र सरकारकडे मागणी करावी की आमचा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे तत्काळ निर्यातबंदी उठवा. दादांचा दरारा त्यांचा आवाजाचा दरारा हा सगळ्यांना ठाऊक आहे. केंद्र सरकारलाही दादांनी तसाच दरारा दाखवावा आणि कांदा निर्यातबंदी उठवावी. दादांकडेच फायनान्स आहे तर त्यांनीच दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही दिलासा द्यावा. हीच आमची मागणी आहे.
उद्यापासून शेतकरी आक्रोश मोर्चा
शेतकरी आक्रोश मोर्चा उद्यापासून सुरू होणार आहे. सहा महत्वाचे मुद्दे घेऊन या मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्यात कांदा निर्यातबंदीचा मुद्दा महत्वाचा आहे. कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ उठवावी तसेच कांद्यासाठी एक धोरण निश्चित करावं. बिबट्यांचा वावर असलेल्या भागात अखंड वीजपुरवठा करावा. पीक विमा योजनेत कंपन्यांचाच फायदा होत आहे. शेतकऱ्यांना काहीच नुकसानभरपाई मिळत नाही. तेव्हा याबाबतीतही धोरण निश्चित करावं.
मागील सहा महिन्यांच्या काळात दुधाचे दर लिटरमागे दहा ते बारा रुपयांनी कमी झाले आहेत. राज्य सरकारने फक्त शासकीय दूध संस्थांना लिटरमागे पाच रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. तसे न करता सरसकट अनुदान जाहीर करावे ही मागणी आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी तसेच शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज घेतेवेळी अनेक जाचक अटींचा सामना करावा लागतो यासंदर्भातही धोरण निश्चित करावं. या सगळ्या मागण्या घेऊन शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. शरद पवारांना भेटून त्यांचं मार्गदर्शन घेतलं. त्यांच्या उपस्थितीत सभा देखील होणार आहे.