विधानपरिषदेच्या आमदार आणि शिवसेनेच्या (Shivsena) नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील बंगल्यात पहाटेच्या सुमारास एका तरुणानं घुसखोरी केल्याची घटना समोर आली आहे. 26 सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे 3 वाजता हा तरुण गच्चीवरुन बंगल्यात शिरला आणि तिथे लपून बसला. मात्र, बंगल्यातील सुरक्षारक्षक आणि ड्युटीवर असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळं त्याला काही तासांतच ताब्यात घेण्यात आलं.
हिमांशू हिरे असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एमएस्सीचं शिक्षण घेत असल्याचा दावा त्यानं पोलिसांसमोर केला आहे. हिमांशू मूळचा नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मॉडेल कॉलनीतील गल्लीत शेवटच्या टोकाला असलेल्या सिल्व्हर रॉक्स या बंगल्यात त्यानं प्रवेश केला होता.
बंगल्यात शिरल्यानंतर हिमांशूनं थेट गच्ची गाठली आणि तिथं लपून बसला. त्यानंतर त्यानं गच्चीवरील पाण्याच्या टाकीचं कनेक्शन बंद करुन तोडलं होतं. सकाळी सुमारे 6.15 वाजता त्याच्या हालचाली लक्षात आल्याची माहिती आहे. त्यानंतर सुरक्षारक्षक आणि ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी शोध घेतला आणि सकाळी सुमारे 7 वाजता त्याला पकडलं.
हिमांशूला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या बॅगेची झडती घेतली. त्यावेळी बॅगेत हातोडा, पकड, हातमोजे आणि सुमारे 10 मीटर लांबीची दोरी आढळून आली. या वस्तूंचा उल्लेख प्रथम माहिती अहवालात करण्यात आला आहे. बंगल्यात प्रवेश करण्यापूर्वी पाण्याच्या टाकीचं कनेक्शन तोडण्यात आल्यानं या घटनेचा तपास अधिक गांभीर्यानं केला जात आहे.
करपलेली पिकं पाहून पंकजा मुंडेंची धाव; बीडच्या बांधावर शेतकऱ्यांच्या डोळ्यात आलं पाणी
घटना घडली त्यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे पुण्यात नव्हत्या. त्या परगावी गेल्या असल्यानं बंगल्यात सुरक्षारक्षक आणि ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळं संशयित तरुण बंगल्यात शिरल्यानंतर त्याच्या हालचालींवर लक्ष गेलं आणि त्याला पकडणं शक्य झालं. या घटनेनंतर लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
दरम्यान, हिमांशूनं आपण विद्यार्थी असल्याचं पोलिसांना सांगितलं असलं तरी त्याच्याकडे वेगवेगळ्या नावांची ओळखपत्रं सापडल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळं त्याची ओळख, पुण्यातील वास्तव्य आणि बंगल्यात प्रवेश करण्यामागचा नेमका उद्देश याचा तपास करण्याची मागणी केली जात आहे. त्याच्याकडील साहित्य नेमकं कशासाठी होतं, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
पोलिसांकडून हा तरुण चोरीच्या उद्देशानं बंगल्यात शिरल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, पहाटेच्या वेळी गच्चीवरुन प्रवेश करणं, पाण्याच्या टाकीचं कनेक्शन तोडणं आणि बॅगेत हातोडा, पकड, हातमोजे व दोरी सापडणं यामुळं त्याच्या हेतूबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा केवळ चोरीच्या अंगानं तपास न करता इतर शक्यताही तपासण्यात याव्यात, अशी मागणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
दरम्यान, संशयित तरुणाला सोडवण्यासाठी काही राजकीय व्यक्तींकडून पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. लोकप्रतिनिधीच्या घरात अशा पद्धतीनं प्रवेश करण्यामागचा नेमका हेतू काय होता, याचा तपास कोणत्याही दबावाशिवाय करुन संपूर्ण सत्य समोर आणावं, अशी मागणी होत आहे.
