Murder in Pune : पुणे : येथे समलैंगिक संबंधातून साथीदाराचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महेश साधू डोके (21) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी हल्लेखोर तरुणााविरोधात लोणीकंद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. मृत्यूपूर्वी महेश डोके याने रुग्णालयात नेताना दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीच्या शोधार्थ दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. (Partner’s murder due to same-sex relationship in Pune)
याबाबत अधिक माहिती अशी की, महेश डोके हा वाघोलीतीली बीजीएस कॉलेजमध्ये बीबीएच्या अखेरच्या वर्षात शिक्षण घेत होता. तर वाडेबोल्हाई येथील एका वसतिगृहात राहत होता. मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास तो कॉलेजमधून घरी निघाला होता. त्याचवेळी बकोरी रस्त्यावर ओळखीतील तरुणाने त्याच्यावर कोयत्याने वार केले. अचानक घडलेल्या या प्रकराने परिसरात एकच खळबळ उडाली.
प्रसंगावधान राखत स्थानिक विद्यार्थ्यांनी महेशला तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, अतिरक्तस्त्रावमुळे त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला संबंधित डॉक्टरांनी दिला. त्यानुसार महेशचा एक मित्र त्याला ससूनमध्ये नेत होता. मात्र, अतिरक्तस्त्रावमुळे वाटेतच महेशचा मृत्यू झाला. यादरम्यान, मृत्यूपूर्वी महेशने हल्लेखोराचे नाव, त्याच्याबाबतची तोकडी माहिती आणि हा हल्ला समलैंगिक संबंधातून झाल्याचे सोबतच्या मित्राला सांगितले.
या माहितीच्या आधारे लोणीकंद पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला असून महाविद्यालयातील आणि वसतिगृहातील महेशच्या मित्रांकडे चौकशी सुरु केली आहे. शिवाय आरोपीच्या शोधार्थ दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच आरोपी ताब्यात येण्याची शक्यता आहे.