पुणे : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे पीसीएम ग्रुपच्या (PCM) पहिल्या सीईटी (CET) प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यार्थी अनेक दिवसांपासून या निकालाच्या प्रतीक्षेत होते. अखेर सीईटी सेलतर्फे सोमवारी निकाल जाहीर करण्यात आला. (PCM Group CET exam released: 26 students got 100 percentile)
विद्यार्थी सीईटी सेलच्या संकेतस्थळावर भेट देऊन निकाल पाहू शकतात. या परीक्षेत एकूण 26 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल गुण मिळाले. त्यातील
24 विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील आहेत. इतर दोन विद्यार्थी पर राज्यातील आहेत.
राज्यातील विद्यार्थ्यांना वर्षातून दोन वेळा सीईटी परीक्षेची संधी प्राप्त व्हावी या उद्देशाने उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे यंदा दोन सीईटी परीक्षा घेण्यात आल्या. त्यातील बहूप्रतीक्षित पीसीएम ग्रुपच्या पहिल्या सीईटी निकाल जाहीर करण्यात आला आहे.
विद्यार्थी https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळाला भेट देऊन परीक्षेचा निकाल पाहू शकतात. निकालाची वैशिष्टे सीईटी सेलतर्फे लवकरच जाहीर केली जाणार आहे.
यंदाचा निकाल अंतिम उत्तरतालिकेच्या (Final Answer Key) आधारे तयार करण्यात आला आहे. परीक्षेदरम्यान प्राप्त झालेल्या हरकतींपैकी 11 शिफ्टमधील एकूण 16 हरकती वैध ठरल्या आहेत. संबंधित विद्यार्थ्यांना बोनस गुण देण्यात आले आहेत. तसेच 4 प्रश्नांच्या उत्तरांमध्ये सुधारणा करून अंतिम उत्तरतालिका अद्ययावत करण्यात आली आहे.
यापूर्वी PCB (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) गटाचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला होता. आता दुसऱ्या प्रयत्नाच्या परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे.
