पिंपरी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली “आपली पीसीएमसी सायक्लोथॉन 2026” ही भव्य सायकल रॅली मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडली. पीसीएमसी सायक्लिस्ट क्लब व त्यांच्या सहकारी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात तब्बल 225 रायडर्स आणि 50 स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धन, निरोगी जीवनशैली आणि शाश्वत वाहतुकीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला. (PCMC Cyclothon Enthusiasm on World Environment Day)
आयर्नमॅन सचिन वाकाडकर तसेच पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे यांच्या हस्ते ध्वज फडकावून वाकड येथील फिटसोल वेलनेस क्लबमधून सायक्लोथॉनला सुरुवात करण्यात आली. या सायक्लोथॉनमध्ये 50 आणि 100 किलोमीटर अंतराच्या दोन रॅलींचे आयोजन करण्यात आले होते. वाकड – हिंजेवाडी – घोटावडे –अंबडवेट –चाले –कोळवन –हाडशी –पवनानगर –कडधे – शिवणे – आडले बुद्रुक – बेबड होळ – चांदखेड – कसरसाई – मारुंजी – वाकड असा निसर्गरम्य मार्ग निश्चित करण्यात आला होता.
सहभागी रायडर्सनी प्रखर उन्हाळा, प्रतिकूल वारे, कठीण चढ-उतार आणि विविध भौगोलिक आव्हानांचा सामना करत हा खडतर प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला. विशेष म्हणजे संपूर्ण प्रवासादरम्यान सर्व रायडर्सनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करत सुरक्षित सायकलिंगचा आदर्श निर्माण केला.
आयोजकांनी प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर न्यूट्रिशन व हायड्रेशन पॉइंटची व्यवस्था केली होती. तसेच संपूर्ण मार्गावर दुचाकी व चारचाकी वाहनांद्वारे मार्शलिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे सहभागींच्या सुरक्षिततेसह आवश्यक सोयी-सुविधांची प्रभावी पूर्तता करण्यात आली.
सायकल हा प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी प्रवासाचा सर्वोत्तम पर्याय असल्याचा संदेश या रॅलीद्वारे देण्यात आला. जागतिक पर्यावरण दिन २०२६ हा हवामान कृती (Climate Action) या संकल्पनेवर केंद्रित असून पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने कृतीशील होण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
यावेळी पीसीएमसी सायक्लिस्ट क्लबतर्फे सर्व रायडर्सना किमान एक झाड लावून त्याचे पुढील एक वर्ष संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले. झाडाचे नियमित संगोपन करणाऱ्या १० रायडर्सना “आपली पीसीएमसी सायक्लोथॉन २०२७” मध्ये मोफत प्रवेश देण्याची घोषणाही करण्यात आली. या उपक्रमामुळे सायकलिंगसोबतच वृक्षसंवर्धनालाही चालना मिळणार आहे.
सायक्लोथॉनची सांगता सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांच्या उपस्थितीत झाली. त्यांनी नागरिकांना दैनंदिन जीवनात सायकलचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. नियमित सायकलिंगमुळे हवेचे व ध्वनी प्रदूषण कमी होते, इंधनाची बचत होते, शारीरिक तंदुरुस्ती वाढते, हृदय निरोगी राहते तसेच मानसिक ताण कमी होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
पीसीएमसी सायक्लिस्ट क्लबचे डॉ. धनराज हेळंबे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेत हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. यावेळी त्यांनी सर्व प्रायोजक, स्वयंसेवक, पोलीस प्रशासन आणि सहभागी रायडर्स यांचे आभार मानले. पर्यावरण संवर्धन, हवामान बदलांविषयी जनजागृती आणि सायकल संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम दरवर्षी अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. “एक सायकल – एक झाड – एक जबाबदार नागरिक” हा संदेश देत पीसीएमसी सायक्लोथॉन २०२६ ने पर्यावरण संरक्षण आणि निरोगी समाजनिर्मितीचा प्रभावी आदर्श निर्माण केला.
