महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध (MPSC) निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी माझ्याविरोधात वैयक्तिक आरोप होत असून राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, या प्रकरणातील प्रश्नपत्रिका फुटीची घटना जानेवारी 2026 मध्ये घडल्याचे निदर्शनास आले आहे. आपण आयोगाच्या अध्यक्षपदाची शपथ 18 फेब्रुवारी 2026 रोजी घेतली असून 3 मार्च 2026 रोजी प्रत्यक्ष पदभार स्वीकारला, असे MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी स्पष्ट केले आहे.
प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण आयोगाने अत्यंत गांभीर्याने घेतले असून यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून सत्य परिस्थिती तपासातून समोर येईल, असे भीमनवार यांनी म्हटले आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि परीक्षा सुरक्षेबाबत शिफारसी करण्यासाठी आयोगाने उच्चस्तरीय अंतर्गत समिती स्थापन केली आहे.
पेपर जानेवारीत फुटला तर मार्चमध्ये परीक्षा का घेतली?; रोहित पवारांचा आयोगाला थेट सवाल
परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणा करण्याच्या दृष्टीने शासनानेही स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आयोगाच्या परीक्षा आणि भरती प्रक्रियेची विश्वासार्हता, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सुरक्षितता अधिक मजबूत करण्यावर आपले लक्ष केंद्रित असल्याचे भीमनवार यांनी सांगितले. वाढलेल्या भरतीच्या जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध सुधारणा हाती घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लाखो उमेदवारांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या सार्वजनिक भरती प्रक्रियेत निष्पक्षता आणि समान संधी राखणे ही आयोगाची महत्त्वाची जबाबदारी आहे. आयोगाची परंपरा, विश्वासार्हता आणि निष्पक्षता जपण्यासाठी आपण पूर्ण पारदर्शकता आणि सचोटीने काम करण्यास कटिबद्ध असल्याचे भीमनवार यांनी नमूद केले. परीक्षा प्रक्रियेवरील उमेदवारांचा विश्वास कायम ठेवणे ही प्राथमिकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक परीक्षांबाबत लोकप्रतिनिधी, उमेदवार आणि नागरिकांनी प्रश्न उपस्थित करणे तसेच आपल्या चिंता व्यक्त करणे स्वाभाविक असून लोकशाही व्यवस्थेत अशा प्रश्नांचे स्वागत केले पाहिजे, अशी भूमिका भीमनवार यांनी मांडली. मात्र, गंभीर आरोप करताना वस्तुस्थिती, अधिकृत नोंदी आणि उपलब्ध पुरावे यांचा आधार घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केलं.
परीक्षा आणि भरती प्रक्रियेसारख्या संवेदनशील विषयाचे वैयक्तिक आरोप किंवा राजकीय वादात रूपांतर होऊ नये, अशी विनंती MPSC अध्यक्षांनी केली आहे. सार्वजनिक भरती प्रक्रियेत लाखो तरुण उमेदवारांचे भवितव्य गुंतलेले असल्याने या विषयाकडे जबाबदारीने पाहणे गरजेचे आहे. प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी तपास सुरू असताना अधिकृत तथ्यांच्या आधारेच निष्कर्ष काढले जावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
