नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; परीक्षा प्रक्रियेशी संबंधित प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना सीबीआयकडून अटक

तपासादरम्यान त्या पेपरफुटी रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे उघड झाल्यानंतर सीबीआयने त्यांना दिल्लीत चौकशीसाठी बोलावले आणि त्यानंतर अटक करण्यात आली.

Untitled Design 35 1

Untitled Design 35 1

Professor Manisha Mandhare in CBI custody :

देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणात आता पुण्याचा कनेक्शन अधिक गडद होताना दिसत आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने पुण्यातील जीवशास्त्राच्या वरिष्ठ प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरे यांना अटक केली आहे. परीक्षा प्रक्रियेशी थेट संबंध असलेल्या मांढरे या ‘नीट’च्या प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या. तपासादरम्यान त्या पेपरफुटी रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे उघड झाल्यानंतर सीबीआयने त्यांना दिल्लीत चौकशीसाठी बोलावले आणि त्यानंतर अटक करण्यात आली.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, मनीषा मांढरे या ‘नीट-यूजी 2026’ परीक्षेच्या प्रक्रियेशी थेट संबंधित होत्या. राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएकडून त्यांची विषयतज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांवर पूर्ण प्रवेश होता. तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, एप्रिल 2026 दरम्यान त्यांनी पुण्यातील मनीषा वाघमारे या महिलेमार्फत काही विद्यार्थ्यांना एकत्र केले आणि पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी विशेष मार्गदर्शन वर्ग आयोजित केले.

या वर्गांमध्ये प्रा. मांढरे यांनी विद्यार्थ्यांना वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विषयांतील संभाव्य प्रश्न समजावून सांगितले. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना ते प्रश्न वहीत लिहून घेण्यास तसेच पाठ्यपुस्तकांमध्ये मार्क करून ठेवण्यास सांगितल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या वर्गांमध्ये सांगण्यात आलेल्या बहुसंख्य प्रश्नांचा प्रत्यक्ष ‘नीट-यूजी 2026’ परीक्षेतील प्रश्नपत्रिकेशी ताळमेळ आढळून आला. ही परीक्षा 3 मे 2026 रोजी घेण्यात आली होती.

नाशिकचा शुभम खैरनार बायोलॉजीचा पेपर फोडायचा; 28 वर्ष प्राध्यापक राहिल्यानंतर पेपर फोडीचा गोरखधंदा

दरम्यान, गेल्या चोवीस तासांत सीबीआयने देशभरातील सहा ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप, बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या साहित्याचे सखोल तांत्रिक विश्लेषण सुरू असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे. या प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने दिलेल्या लेखी तक्रारीनंतर 12 मे 2026 रोजी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर विशेष तपास पथके तयार करून देशभरातील विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले आणि अनेक संशयितांची चौकशी करण्यात आली.

आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथून एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी पाच आरोपींना न्यायालयात हजर करून सात दिवसांची पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे. काल अटक करण्यात आलेल्या आणखी दोन आरोपींना पुणे न्यायालयात हजर केल्यानंतर ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला नेण्यात आले असून त्यांना दिल्लीतील न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.

सीबीआयच्या तपासात रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटीचा मूळ स्रोत उघडकीस आला असून विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन वर्गासाठी लाखो रुपये आकारण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. या वर्गांमध्ये परीक्षेत येणारे प्रश्न विद्यार्थ्यांना सांगितले जात होते आणि त्यावर चर्चा केली जात होती, असा दावा तपास यंत्रणेने केला आहे.

देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या प्रकरणामुळे शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सीबीआयकडून या संपूर्ण रॅकेटचा सखोल, निष्पक्ष आणि व्यावसायिक तपास सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version