Pune BJP : मोहोळांच्या बैठकीनंतर भाजपमध्ये पुन्हा धुसफूस? बिडकरांच्या बैठकीने चर्चांना उधाण

पुणे भाजपच्या नगरसेवकांमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या बैठकीनंतर पुन्हा धुसफूस सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Murlidhar Mohol Punit Balan

Murlidhar Mohol Punit Balan

Pune BJP Controversy : पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पक्षातील नगरसेवकांच्या नाराजीचा मुद्दा काही दिवसांपूर्वी खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या बैठकीत समोर आला होता. प्रशासनाच्या कामकाजापासून विकासकामांपर्यंत अनेक मुद्द्यांवर नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षातील समन्वयाचा संदेश दिला जात असतानाच आता महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांमधील कथित मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.

सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त आणि विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांची स्थिती, रखडलेली कामे आणि प्रशासनाकडून प्रलंबित असलेल्या निर्णयांचा या बैठकीत आढावा घेण्यात आल्याचे समजते. मात्र, या बैठकीला महापौर मंजूषा नागपुरे आणि स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले उपस्थित नसल्याची माहिती समोर आल्यांनतर पालिकेतील भाजपच्या अंतर्गत समन्वयावर प्रश्न उपस्थित झाला आहे.

काही दिवसांपूर्वी मुरलीधर मोहोळ यांनी भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेतली होती. या बैठकीत शहरातील विविध प्रश्नांवर नगरसेवकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली होती. यामध्ये रस्त्यांची दुरवस्था, कचरा, खड्डे, समाविष्ट गावांमधील कर आकारणी, विकासनिधी, प्रभाग समित्यांचे अधिकार आणि अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या कार्यपद्धतीबाबत नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केल्याची चर्चा होती.

प्रशासनावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे मत या बैठकीत व्यक्त झाल्याची माहिती आहे. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबतही नाराजी असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होती. यानंतर पक्षातील सर्वांनी समन्वयाने काम करण्याचा संदेश दिला. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच झालेल्या बिडकरांच्या बैठकीमुळे अंतर्गत राजकारणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. या बैठकीला आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आणि विविध विभागांचे प्रमुख अधिकारी बैठकीला उपस्थित होते. नदीकाठ सुधार प्रकल्पासह शहरातील काही महत्त्वाच्या विकास प्रकल्पांतील अडचणी, प्रलंबित कामे आणि आगामी योजनांवर चर्चा झाल्याचे समजते.

दरम्यान, महत्त्वाच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली असताना महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष यांना निमंत्रण होते का, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील निर्णयप्रक्रियेत समन्वयाची नेमकी स्थिती काय आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. बैठकीबाबत स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी आपल्याला या बैठकीची माहिती नसल्याचे म्हटले आहे. प्रकृती खराब असल्याचे त्यांनी कारण दिले.

भिमाले यांच्या या प्रतिक्रियेमुळे बैठकीच्या निमंत्रणाचा आणि पक्षांतर्गत समन्वयाचा मुद्दा आणखी चर्चेत आला आहे. महापालिकेतील महत्त्वाच्या विकासकामांवर बैठक होत असताना संबंधित प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्याची माहिती होती का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एका बाजूला भाजपचे नगरसेवक प्रशासनाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्येच महत्त्वाच्या बैठकांबाबत समन्वय आहे का, यावर चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे मोहोळांच्या बैठकीनंतर भाजपमधील नाराजी कमी झाली की अंतर्गत मतभेद आणखी पुढे आले, याबाबत महापालिका वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. दरम्यान, महापौर मंजूषा नागपुरे यांची या प्रकरणातील अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

Exit mobile version