Let’supp Special : मुळीक, बिडकर, जय-पार्थ Vs दिग्गजांची फौज; पुणे विधान परिषदेसाठी कोणाला लॉटरी?

Pune उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाकडे असलेल्या या जागेवर आता महायुतीतच मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

  • Written By: Published:
मुळीक, बिडकर, जय-पार्थ विरूद्ध दिग्गजांची फौज पुणे विधान परिषद निवडणुकीत कोणाला लॉटरी?

राज्यात राजकीय धुरळा उडवून देणाऱ्या विधान परिषदेच्या 17 जागांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाकडे असलेल्या या जागेवर आता महायुतीतच मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. ही निवडणूक केवळ एका जागेची नसून, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि पुत्र पार्थ पवार यांचे पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्चस्व आणि बळ ठरवणारी ठरणार आहे. या निवडणुकांबाबत लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी विश्लेषण…

महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेचे बलाबल; कोणाकडे किती मते?

पुणे मतदारसंघात पुणे जिल्हा परिषद, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांसह जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व पंचायत समित्यांचे सभापती मतदान करणार असून एकूण मतदारांची संख्या 781 आहे. अजित पवार गटाचा सर्वाधिक मतदारांमुळे या जागेवर नैसर्गिक हक्क असला, तरी भाजप आणि शिंदे गट एकत्र आल्यास ही बेरीज 350 च्या पार जाते. त्यामुळे दोन पक्ष एकत्र येऊन अजित पवार गटाच्या हक्काच्या जागेवर दावा ठोकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोणाकडे किती मते

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : 322 मते (सर्वाधिक – जिल्हा परिषद व नगरपालिकांवर वर्चस्व)

भारतीय जनता पक्ष (भाजप) : 296 मते (पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ताकद)

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) : 70 मते (किंग मेकरच्या भूमिकेत)

काँग्रेस :  19 मते

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : 12 मते

अपक्ष आणि इतर पक्ष : 26 मते

इच्छुकांची भाऊगर्दी; कोणाचे नाव आघाडीवर?

या निवडणुकीत दोन्ही बाजूंकडून तगड्या नेत्यांची फौज आणि आर्थिक ताकद असलेले उमेदवार मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. ज्यात दादांच्या तरुण समर्थक वर्गाकडून पार्थ पवार किंवा जय पवार यांच्या नावाची मागणी होऊ शकते. तसेच पार्थ पवार यांच्या टीममधील माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. त्याशिवाय पक्षातील ज्येष्ठ नेते रमेश थोरात, खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते आणि जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी पक्ष त्यांच्या नावाचा विचार करू शकतो. जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमधून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे सुरुवातीपासून इच्छुक आहेत तर, पिंपरी-चिंचवडमधून नाना काटे, माजी आमदार विलास लांडे किंवा अजित गव्हाणे यांच्या नावांचीही चर्चा आहे.

 भाजपमधून कोण दावेदार?

भाजपमध्ये गेल्या निवडणुकांमध्ये दिलेले ‘शब्द’ आणि आश्वासन पूर्ण करण्यासाठी नेत्यांचे डोळे या निवडणुकीकडे लागले आहेत. त्यामुळे या निवडणुकीसाठी वडगाव शेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी टाळली होती, तेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून त्यांच्या योग्य पुनर्वसनाचा शब्द दिला होता. त्यामुळे मुळीक समर्थक या जागेवर मोठा दावा करत आहेत. मुळीक यांच्याशिवाय शिरूर लोकसभा मतदारसंघातून भाजपला जागा न सुटल्याने संधी हुकलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनीही या निवडणुकीसाठी मोठी तयारी सुरू केली आहे. पुणे महापालिकेचे माजी गटनेते गणेश बिडकर यांनी आधीपासूनच या जागेसाठीची रणनीती आणि गणिते पक्की केली आहेत. तर, कसबा पेठ पोटनिवडणुकीवेळी शब्द मिळालेले भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे आणि पक्षाचे सरचिटणीस राजेश पांडे यांच्याही नावाची पक्षांतर्गत चर्चा आहे.

थोडक्यात काय तर, पुण्याची ही जागा महायुतीच्या जागावाटपात नक्की कोणाच्या पदरात पडते, यावरच पुढचे संपूर्ण गणित अवलंबून आहे. जागावाटपाचा हा तिढा सुटल्यास दोन्ही पक्षांतील अंतर्गत स्पर्धा संपून मुख्य लढतीचे चित्र स्पष्ट होईल.

follow us