Download App

आयुष कोमकर हत्या प्रकरणात फरार झालेल्या चौघांना बेड्या; थेट गुजरातमधून केली अटक

या प्रकरणात फरार झालेल्या आंदेकर टोळीतील चौघा जणांना पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे.

Pune Ayush Komkar Murder Case Andekar Gang : पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात फरार झालेल्या आंदेकर टोळीतील चौघा जणांना गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. आयुष उर्फ गोविंदा कोमकर हत्या प्रकरणात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आता या प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या आठ झाली आहे. या प्रकरणी याआधी 8 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये बंडू आंदेकर (64), तुषार वाडेकर (24), स्वराज वाडेकर (21), वृंदावनी वाडेकर (40), अमन युसूफ पठाण उर्फ खान (22), सुजल मेरगू (23), तसेच अमित पाटोळे (19) आणि यश पाटील (19) यांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या झाली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा खून आंदेकर टोळीने केल्याचे निष्पन्न झाले आहे. वनराज आंदेकरांचा बदला घेण्यासाठी आंदेकर गँगकडून काही केलं जाऊ शकतं याची शक्यता होती म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली होती. मात्र आंदेकरच्या टोळीने गणेश कोमकरचा मुलगा टार्गेट केल्याने गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात एकच खळबळ उडाली होती.

पोलिसांनी घेतलं मनावर..बंडू आंदेकरला मध्यरात्री नाना पेठेत आणून घराची झाडाझडती 

पोलीस तपासात ही हत्या वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला (Ayush Komkar Murder Case) म्हणून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदेकरला नाना पेठेत आणून त्याच्या घराची संपूर्ण झाडाझडती घेतली होती. या कारवाईदरम्यान आयुष कोमकर हत्येच्या प्रकरणात काही नवे पुरावे हाती लागतात का हे तपासण्यात आले. पोलिसांच्या या हालचालीमुळे आंदेकर टोळीच्या नांग्या ठेचण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, खरंच पोलीस असं करतील का आणि पुण्यातील गॅंगवॉर संपवतील का? याकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागलं आहे.

आयुष कोमकर हत्येमध्ये पोलिसांनी आवळल्या मुसक्या; बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक

नेमकं काय घडलं

पुण्यातील नाना पेठेत कोमकर कुटुंब वास्तव्यास आहे. 5 सप्टेंबर 2025 ला संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आयुष त्याचा लहान भाऊ अर्णवला क्लासमधून घेऊन आला. इमारतीच्या बेसमेंटमध्ये दोघे आले. आयुष गाडी पार्क करत होता. नेमक्या याच वेळी त्याच्यावर पाळत ठेऊन असलेले दोघे समोर आले. त्यांनी आयुषवर तब्बल 12 राउंड फायर केले. यातील 9 गोळ्या आयुषला लागल्या आणि तो तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला. यानंतर गोळीबार करणारे दोघे जण फरार झाले. या घटनेने पुण्यातील टोळीयुद्ध पुन्हा चव्हाट्यावर आले.

follow us