Pune Jain Bording Land Case Charity Commissioner Cancels Deal : पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात ट्रस्ट आणि गोखले बिल्डर यांच्यात झालेला जमीन व्यवहार अखेर रद्द करण्यात आला आहे. गोखले बिल्डर्सकडून हा जमीन व्यवहार रद्द करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार, गोखले बिल्डर्सने माघार घेताच आता, धर्मादाय आयुक्त यांनी जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
ट्रस्टने नेमकं काय सांगितलं?
दोन दिवसांपूर्वी धर्मदाय आयुक्तांसमोर पार पडलेल्या सुनावणीवेळी गोखले बिल्डरच्या (Gokhale Builder) माघारीनंतर ट्रस्टनेदेखील जैन बोर्डिंगचा व्यवहार मोडीत काढण्याची तयारी दर्शवली होती. जो काही व्यवहार सुरू होता तो आम्ही रद्द करण्याच्या तायरीत असल्याचे ट्रस्टच्या वकिलांनी सुनावणीवेळी सांगितले होते. या संपूर्ण प्रकरणा संदर्भातील कागदपत्र आली असून आम्हाला युक्तीवादापूर्वी अभ्यास करण्यासाठी १ ते २ दिवस मिळावे ही विनंती केली होती. त्यावरील सुनावणीसाठी आजची तारखी देण्यात आली होती. ज्यात आयुक्तांनी संबंधित व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
गोखले बिल्डरकडून जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द
जैन बोर्डिग व्यवहार प्रकरणात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यावर याप्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. मात्र, मोहोळांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर अखेर हा व्यवहार गोखले बिल्डरकडून रद्द करण्यात येत असल्याचा मेल ट्रस्टला पाठवण्यात आला होता. त्याचबरोबर व्यवहारातील 230 कोटी रुपये परत देण्याची विनंती केली. धर्मादाय आयुक्तालयाला देखील पत्र पाठवण्यात आलं आहे. ट्रस्टला पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये नमूद करण्यात आलं आहे की, नैतिकतेच्या मुद्द्यावर आपण या व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जैन धर्मियांच्या यामुळे भावना दुखवायच्या नव्हत्या. असेही गोखले बिल्डरकडून मेलमध्ये सांगण्यात आले होते.
