मुंबई : मुंबई विमानतळ म्हटलं की, डोळ्यासमोर उभं राहतं ते चित्र म्हणजे हातात बॅगा घेऊन उभ्या असलेल्या प्रवाशांची गर्दी. कधी कधी याच गर्दीचा फायदा घेत आणि चालाखी करत अनेकजण तपास अधिकाऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात. पण फसतील ते अधिकारी कसले. असाच काहीसा प्रकार पुण्याच्या (Pune) भालेराव काकांसोबत घडला. या काकांनी केलेली युक्ती अधिकाऱ्यांच्या लक्षात आली अन् काकांचं बिंग फुटलं. सध्या या काकांना त्यांनी केलेल्या उल्लंघनाबद्दल अटक करण्यात आली आहे. आता हे प्रकरण नेमकं काय? भालेराव काकांनी असं नेमकं केलं तरी काय? हेच आपण जाणून घेऊया. (Pune Man Tears Passport Pages To Hide Bangkok Trips)
Video : COEP चे माजी विद्यार्थी अन् पुण्यातील प्रसिद्ध व्यवसायिकाचा बिहारमध्ये ‘सायबर मर्डर’
नेमकं घडलं काय?
तर, त्याचं झालं असं की, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) वय वर्षे 51 असलेले पुण्याचे विक्रम भालेराव इंडोनेशियामध्ये आठवडाभराची सुट्टी घालवून परत आले. मात्र, त्यांना तपासणीवेळी अटक करण्यात आली. अटकेचं कारण काय तर, भालेराव काकांनी त्यांच्या पासपोर्टची पानं फाडली. मात्र, चौकशीमध्ये पासपोर्टची पानं का फाडली याचं कारण सांगितलं अन् काकांचं बिंग फुटलं.
घरच्यांपासून लपवायची होती बँकॉक ट्रिप
ज्यावेळी भालेराव काका इंडोनेशिया येथे आठवडाभराची सुट्टी एन्जॉय करून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परतले तेव्हा इमिग्रेशन अधिकारी नेहमीप्रमाणे तपासणी करत होते. त्यावेळी अधिकाऱ्यांना विक्रम भालेराव यांच्या पासपोर्टची पानं क्रमांक 17/18 आणि 21-26 गायब असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे काकांना थांबवण्यात आले. त्यांची चौकशी झाली पण काका काही केल्या पानं का फाडी हे सांगायला तयार नव्हते.
मग काय काकांना सहाय्यक इमिग्रेशन अधिकारी राजीव कुमार यांनी विंग इंचार्ज विलास वडनेरे आणि ड्यूटी ऑफिसर विजय कुमार यादव यांच्यासमोर उभे केले. अखेर खोदून खोदून चौकशी केल्यानंतर भालेराव काकांनी आपण बँकॉकला (Bangkok Trip) गेल्याचे शिक्के होते. ही बाब आपल्याला कुटुंबापासून लपवून ठेवायची होती. त्यामुळे ही पाने फाडल्याचे भालेराव यांनी कबूल केले.
काय सांगता? इंस्टाग्राम-व्हॉट्सअप विकले जाणार…फसवणुकीच्या प्रकरणात मार्क झुकेरबर्ग अडकले?
लपवाछपवीसाठी वापरलेली ट्रिक आली अंगलट
पानं का फाडली याचे कारण भालेराव काकांनी अधिकाऱ्यांना सांगितले जरी असले तरी, लपवाछपवीसाठी वापरलेली ट्रिक भालेराव काकांच्याच अंगलट आली आहे. कारण, पासपोर्ट ॲक्ट, 1967 नुसार पासपोर्टचे नुकसान करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे भालेराव यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318 (4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या न्यायालय या प्रकरणावर काय निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.