2030 पर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड देशातील महत्वाचे मोबिलिटी केंद्र बनणार…CM फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

2030 पर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड देशातील महत्वाचे मोबिलिटी केंद्र बनणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

Cm Fadanvis

Cm Fadanvis

CM Devendra Fadanvis : पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश (पीएमआर) परिसरात मेट्रो, इलेक्ट्रिक बस, इनर रिंगरोड, आउटर रिंगरोड, बोगदे आणि नव्या विमानतळासह आधुनिक वाहतूक सुविधांचे जाळे उभारण्यात येत आहे. या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून २०३० पर्यंत पुणे महानगर प्रदेश देशातील महत्त्वाचे मोबिलिटी केंद्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांनी व्यक्त केला.

हिंजवडी आणि परिसर हा देशातील महत्त्वाचा आयटी हब आहे. या परिसरात दररोज हजारो कर्मचारी कामासाठी येतात. वाहतूक कोंडीमुळे त्यांना अनेकदा एक ते दोन तास अडकून पडावे लागते. मेट्रो सुरू झाल्यामुळे आयटी क्षेत्रातील कर्मचारी, विशेषतः तरुण- तरुणींना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन २०१८ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यांच्याच हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होत असल्याचा आनंद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

देशात सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) मेट्रो प्रकल्प उभारण्याच्या धोरणानंतर शिवाजीनगर-हिंजवडी हा पहिला प्रकल्प ठरला. डीबीओटी तत्त्वावर टाटा प्रोजेक्ट्स आणि सीमेन्स यांनी या प्रकल्पाची उभारणी केली. केंद्र व राज्य सरकारचे सहकार्य, व्यवहार्यता तफावत निधी आणि महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आलेले जमीन संपादन यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास आला. या प्रकल्पाच्या उभारणीपासून संचालनापर्यंत महिलांचे योगदान महत्त्वाचे असून ही ‘पिंक पॉवर्ड’ मेट्रो महिला शक्तीच्या सहभागाचे प्रतीक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

पुणे शहरात सुमारे १२० किलोमीटरचे मेट्रो मार्ग तयार झाले असून काही मार्गांची कामे सुरू आहेत. देशातील मेट्रो विस्ताराचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला झाला आहे. राज्यातील १२ महापालिका क्षेत्रांत मेट्रो सुरू आहे किंवा तिचे काम सुरू आहे. मेट्रो ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून आर्थिक विकासाला चालना देणारी यंत्रणा आहे. मेट्रोमुळे गुंतवणूक, रोजगार आणि त्याभोवतीचे आर्थिक परिसंस्थेचे जाळे विकसित होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पुणे महानगर प्रदेशाला मोठे शहरी विकास केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने पाच हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीच्या माध्यमातून पुणे आणि पीएमआर परिसरात आधुनिक वाहतूक व्यवस्था विकसित करण्याचे नियोजन आहे. पुणे मेट्रो ही ग्रीन मेट्रो म्हणून विकसित होत असून आवश्यक ऊर्जेपैकी ३० टक्के ऊर्जा स्वतः निर्माण करणार आहे. पुणे परिसरात मेट्रो, इलेक्ट्रिक बसेस, इनर व आउटर रिंगरोड, सीएमटीआर, भूमिगत मार्ग आणि बोगद्यांचे जाळे विकसित होत आहे. यामुळे पुणे केवळ आयटी आणि उत्पादन क्षेत्राचेच नव्हे, तर फ्रंटियर टेक्नॉलॉजीचेही महत्त्वाचे केंद्र बनेल. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यात पुण्याचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

देशात पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच गरिबी निर्मूलन आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे. विकासाच्या प्रक्रियेत सर्वसामान्य नागरिक आणि समाजातील शेवटच्या घटकाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकारचे सहकार्य आणि मार्गदर्शन कायम मिळत राहील, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी करण्यामध्ये मेट्रो महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मेट्रो-३ हा पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला कलाटणी देणारा प्रकल्प असून, पुण्याच्या भविष्याला नवा आकार देणारा आणि नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीच्या समस्या कमी करणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. पुण्याच्या विकासात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या योगदानाचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, पुणे मेट्रो मार्गिका-३ देशातील पहिली १०० टक्के महिला संचालित मेट्रो ठरणार सांस्कृतिक, शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र असलेल्या पुणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीची गरज लक्षात घेता आधुनिक, सुरक्षित व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. पुणे मेट्रो मार्गिका-३ ही देशातील सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) साकारलेली पहिली मेट्रो मार्गिका असून, सुमारे ८ हजार ३१३ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. विशेष म्हणजे, ही मार्गिका देशातील पहिली १०० टक्के महिला संचालित मेट्रो ठरणार असून, सुमारे १०० महिला ट्रेन पायलट आणि स्थानकांवरील ५० टक्के महिला कर्मचारी या मार्गिकेचे संचालन करणार आहेत, हे अभिमानास्पद असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या.

सन २०१८ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गिकेची पायाभरणी झाली होती. टप्पा-२ मधील चार विस्तारित मार्गिकांनाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, आज त्यांचे भूमिपूजन होत आहे. या ३१ किलोमीटर लांबीच्या आणि २८ स्थानकांच्या मार्गिकांसाठी केंद्र सरकारने सुमारे ९ हजार ८५८ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या विस्तारामुळे वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते विठ्ठलवाडी, कोथरूड, बावधन, विमाननगर, खराडी आणि वाघोली हे भाग जोडले जाणार असून, सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे मेट्रोचे जाळे १०० किलोमीटरपेक्षा अधिक होईल. या मार्गावरील आर. के. लक्ष्मण संग्रहालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ही स्थानके अनुक्रमे ‘कॉमन मॅन’ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला अभिवादन करणारी ठरतील, असा उल्लेख त्यांनी केला.

पुणे मेट्रोच्या प्रत्येक सविस्तर प्रकल्प अहवालाच्या (डीपीआर) निर्मितीपासून मंजुरीपर्यंत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. अर्थमंत्री म्हणून त्यांनी प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला, तसेच जुलै महिन्यात हिंजवडीतील मेट्रो स्थानकांची पाहणी करून कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Exit mobile version