Pune MLC Result : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरु करण्यात आलीयं. पुण्यात मतमोजणीदरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांकडून अरेरावीची भाषा केली जात असल्याचा गंभीर आरोप पुणे शिक्षक मतदारसंघातील (Pune MLC Result) कॉंग्रेसचे उमेदवार जयंत आजगावकर (Jayant Aajgavkar) यांनी केला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या वर्तवणुकीवरुन जयंत आजगावकर यांनी हरकत घेतली आहे. त्यामुळे पुण्यात मतमोजणी केंद्रावर मोठा राडा सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत अद्याप अधिकृतपणे माहिती समोर आलेली नसून सुत्रांकडून माहिती देण्यात येत आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक शुक्रवारी 23 ऑक्टोबर रोजी पार पडली असून आज मतमोजणी प्रक्रिया सुरु आहे. या मतमोजणीदरम्यान मतमोजणी केंद्राच्या आतमधील सीसीटिव्ही कॅमेरे बंद असून उमेदवारांच्या प्रतिनिधींना कागद पेन आणून दिले जात नाही. निवडणूक अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचे सहकार्य केले जात नाही. याउलट अधिकाऱ्यांकडून अरेरावीची भाषा केली जात असल्याचा गंभीर आरोप जयंत आजगावकर यांनी केला आहे. विशेष म्हणजे उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून गाडीच्या किल्ल्या, पाकीट, सर्व काढून घेत आहे, निवडणूक अधिकारी हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
पुणे पदवीधर मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून मतपत्रिकांचे ५०-५० चे गठ्ठे तयार करण्याचे काम सुरू आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेला साधारणपणे 4 वाजणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मतपत्रिकांचे गठ्ठे केल्यानंतर पात्र, अपात्र मतपत्रिकांचं वर्गीकरण केले जाणार असून मतपत्रिकाच्या नुसार विजयासाठीचा कोटा निश्चित केला जाणार आहे. कोटा निश्चितीनंतर मतपत्रिकांचं उमेदवार निहाय वर्गीकरण होणार आहे. त्यानंतरच प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार आहे.
दरम्यान, मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली असतानाच पुण्यातील मतमोजणी केंद्रावर कॉंग्रेसचे उमेदवार जयंत आजगावकर यांच्यासह समर्थकांकडून निवडणूक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले जात आहेत. त्यामुळे या मतमोजणी केंद्रावर दिवसभरात काही राडा होईल का? असा अंदाज वर्तवला जात आहे. कुठलाही अनूसुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला असून स्थानिक प्रशासन खबरदारी घेत आहे.
