Download App

Pune News : विरोधाचा ‘आवाज’ वाढला! बागेश्वर बाबांविरोधात ‘अंनिस’ मैदानात; कारवाईची मागणी

Pune News : बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार यांचा हनुमान कथा सत्संग व दिव्य दरबार कार्यक्रम पुण्यात (Pune News) होणार आहे. भाजपाचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मात्र, सुरू होण्याआधीच हा कार्यक्रम वादात सापडला आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने या कार्यक्रमाला विरोध केला. अंधश्रद्धा निर्मुलन समितीही विरोधात आली आहे. बागेश्वरच्या बाबांचे दावे घटनाविरोधी आणि अशास्त्रीय आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीने केली आहे, अशी माहिती समितीचे कार्यकर्ते विशाल विमल यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांना निवेदन देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

बागेश्वरचे बाबा हे लोकांच्या देव, धर्म, श्रद्धा, उपासना आणि अज्ञानाचा गैरफायदा घेऊन विसंगत, अशास्त्रीय, अवैज्ञानिक गोष्टी सांगत आहेत. लोकांना प्रभावित करत असून अशास्त्रीय मार्गाने जगण्यास प्रवृत्त करत आहेत. हे भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीने विसंगत आहे. राज्यात दहा वर्षांपासून जादूटोणाविरोधी कायदा लागू आहे. या कायद्याचे उल्लंघन बागेश्वरच्या बाबांकडून होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आम्ही केल्याचे विशाल विमल यांनी सांगितले.

Maratha Reservation : ‘होय, मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे’ बागेश्वर बाबांनी कारणही सांगितलं

पुण्यात होत असलेल्या या कार्यक्रमाचे व्हिडीओ शूटिंग करण्याची सूचना संयोजकांना शासनाने द्यावी. प्रचलित कायद्यांच्या विसंगत विधाने, भाष्य, वक्तव्ये, इशारे, कृत्य घडल्यास बाबांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी. सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी वक्तव्ये बागेश्वरच्या बाबांकडून घडू नयेत यासाठी बाबा आणि कार्यक्रमांच्या संयोजकांना सक्त ताकीद द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

अजित पवार गटाचाही विरोध

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही धीरेंद्र शास्त्रींच्या या कार्यक्रमाला विरोध केला आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे सुदर्शन जगदाळे यांनी पुण्यातील ​​बागेश्वर धाम सरकारच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे. जगदाळे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर धीरेंद्र शास्त्री यांचा एक प्लेक्स पोस्ट टाकून संत तुकारामांच्या भूमीत खोट्या बाबांना थारा नाही, असे लिहिले आहे. विशेष म्हणजे अजित पवार महायुतीला पाठिंबा देऊन सत्तेत आले. अशातच अजितदादा गटाकडून भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला विरोध सुरू झाल्यानं चर्चांना उधाण आलं.

बागेश्वर धाम महाराजांच्या कार्यक्रमाला अनिसचा विरोध, जादूटोणा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी

Tags

follow us