Kisan Maharaj Sakhare : संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायाचा वसा जपणारे ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 89 वर्षांचे होते. सोमवारी रात्री उशिरा चिंचवड येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे साखरे महाराज यांनी दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यातच त्यांची प्राणज्योत मालवली. साखरे महाराज यांच्या मागे एक मुलगी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.
आज (मंगळवार) त्यांचं पार्थिव आळंदी येथील साधकाश्रम येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आळंदी येथील साधकाश्रम येथे गुरू शिष्य परंपरेचा स्वीकार केला. संत साहित्य, तत्वज्ञान, व्याकरणशास्त्र यांचे अध्ययन केले. सन 1960 मध्ये साधकाश्रमाची धुरा साखरे महाराजांच्या हाती आली. तेव्हापासून साखरे महाराज यांनी येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना संत साहित्य आणि तत्वज्ञानाचे शिक्षण दिले.
कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून अध्यात्मिक प्रबोधनाचा मोठं कार्य त्यांनी अविरतपणे केलं. कीर्तन, प्रवचन करणारे हजारो विद्यार्थी त्यांनी घडवले. आळंद देहू परिसर विकास समितीच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. ग्रंथराज ज्ञानेश्वरीची दृकश्राव्य प्रत त्यांनी प्रकाशित केली होती. साखरे महाराज यांनी मराठी भाषेतून जवळपास 115 ग्रंथांची निर्मिती केली. सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ एकनाथी भागवत, सार्थ तुकाराम महाराज गाथा, सार्थ भगवद्गीता, सार्थ ब्रह्मसूत्र, सार्थ उपनिषद, सोहम योग, ज्ञानेश्वर महाराज चरित्र आदी ग्रंथांचं लेखन त्यांनी केलं.
एकूण 500 ताम्रपटांवर त्यांनी ज्ञानेश्वरी प्रकाशित केली. महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांना 2018 मध्ये ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराने गौरवण्यात आले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने साखरे महाराजांना डी. लीट पदवी देऊन सन्मानित केले होते.