Mahadev Jankar : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) काही दिवसांपासून भाजपवर थेट प्रहार करू लागले आहेत. त्यांनी आता भाजपविरोधाचा अजेंडा सेट केला असून राज्यात ठिकठिकाणी जाऊन भाजपवर (BJP) घणाघाती टीका करत आहेत. आताही पुणे दौऱ्यावर असताना जानकर यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला. 2014 मध्ये आम्ही भाजपला मुख्यमंत्री केले. त्यामुळे मला मंत्री करून भाजपने माझ्यावर उपकार केले नाहीत. माझ्यामुळेच भाजप महाराष्ट्रात सत्तेत होता, असा टोला त्यांनी लगावला.
जानकरांचा भाजपला दणका! जागांची मागणी करत ‘इंडिया’त जाण्याचे दिले संकेत
पुण्यातील न्हावरे येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने काढण्यात आलेल्या जनस्वराज्य यात्रेत ते बोलत होते. जानकर पुढे म्हणाले, भाजप आणि काँग्रेस (Congress) एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे दोन्ही पक्ष वेश बदलून जनतेला लुटण्याचे काम करत आहेत. भाजपवाले म्हणत असतील की आम्ही जानकरांना मंत्री केले म्हणून काय त्यांनी माझ्यावर उपकार केले नाहीत. मीच त्यांना मुख्यमंत्री केले. काँग्रेस आणि भाजप कधीच आरक्षण देणार नाहीत. या पक्षांनी फक्त जनतेला झुलवत ठेवण्याचे काम केले. याआधी आम्ही भाजपबरोबर होतो. पण आता त्यांना लहान पक्षांची गरज राहिलेली नाही. त्यामुळे भाजपाच्या मागे न लागता स्वतःच्या बळावर पक्षाचा विस्तार करण्याचे ठरवले आहे, असेही जानकर (Mahadev Jankar) म्हणाले.
जानकर यांनी काही दिवसांपूर्वी सांगलीतील विटा येथे भाजप आणि काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. भाजप (BJP) ज्यावेळी सत्तेत येत नव्हता त्यांना दीड ते दोन टक्के मतांची गरज होती. त्यावेळी त्यांनी आमच्याशी युती केली. सत्ता हस्तगत केली. त्यानंतर मात्र सत्तेचा घमंड डोक्यात शिरला. चूक त्यांची नाही तर आमची आहे. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष सारखेच आहेत. त्यामुळे आता भाजपपासून अंतर राखत पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यावेळी जानकर (Mahadev Jankar) म्हणाले होते.
दरम्यान, जानकर (Mahadev Jankar) यांनी आता लोकसभा निवडणुकीचीही तयारी केली आहे. लोकसभेसाठी थेट उत्तर प्रदेशातून त्यांनी तयारी केली आहे. उत्तर प्रदेशातील मिर्जापूर मतदारसंघातून तिकीट फायनल असल्याचेही त्यांनी मध्यंतरी सांगितले होते. त्यामुळे एकंदरीतच त्यांनी आता लोकसभा आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे.
पडळकरांना आवर घालावा नाही तर आम्ही सत्तेत आहोत हे विसरू; अमोल मिटकरांचा थेट इशारा