Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येचं प्रकरण राज्यभरात (Vaishnavi Hagawane Death Case) चर्चेत आहे. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली होती. यानंतर त्यांचं दहा महिन्यांचं बाळ नेमकं कुणाकडे होतं याचा पत्ता लागत नव्हता. प्रसारमाध्यमांत यासंदर्भात उलटसुलट बातम्या येत होत्या. अखेर बाळ सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. वैष्णवी हगवणे यांचं दहा महिन्यांचं बाळ आता त्यांच्या आईवडिलांकडे सोपवण्याच्या सूचना राज्य महिला आयोगाने दिल्या आहेत. लवकरच बाळ वैष्णवीच्या आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. दरम्यान, महिला आयोगाच्या सूचनांनुसार या बाळाचा ताबा वैष्णवीच्या आई वडिलांकडे देण्यात आला आहे.
याबाबत राज्य महिला आयोगाच्या अधिकृत एक्स हँडलवरून ट्विट करत माहिती देण्यात आली होती. वैष्णवी हगवणेच्या बाळाचा ताबा आज तिच्या आई वडिलांकडे देण्यात येईल. हगवणे कुटुंबातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून दोघे जण फरार आहेत. वैष्णवी यांचं दहा महिन्यांचं बाळ राजेंद्र हगवणेंच्या मावस भावाकडे होतं अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
वैष्णवी हगवणे यांच्या बाळाचा ताबा आज वैष्णवीच्या आई वडिलांकडे देण्यात येईल.
हगवणे कुटुंबातील ३ आरोपी अटक आणि २ फरार असताना वैष्णवी यांचे १० महिन्यांचे बाळ राजेंद्र हगवणे यांच्या मावस भावाकडे होते…
— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) May 22, 2025
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महिला नेत्यांना बाळ कस्पटेंकडे सोपवण्याच्या सूचना दिल्या होत्या. वैशाली नागवडे आणि रुपाली पाटील (Rupali Patil) यांना बाळ कस्पटेंच्या घरी जाऊन सुपूर्द करायला सांगितलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हुंड्यासाठी वैष्णवीचा सासरच्या लोकांनी शारिरीक आणि मानसिक छळ केला होता. त्यामुळेच वैष्णवीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता. या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांकसह सासू लता आणि नणंद करिष्मा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या कोठडीत येत्या 26 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सासरा राजेंद्र, दीर सुशील अजूनही फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीस (Pune Police) प्रयत्न करत आहेत.