Pune Police : अल्पवयीन आरोपींना कारच्या बोनेटवर बसवून त्यांची धिंड काढल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातून एक मोठी बातमी समोर आली आहे. याप्रकरणी सीआयडीने गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर पाऊल उचलत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील ४ अधिकारी आणि ११ अंमलदार अशा एकूण १५ पोलिसांच्या तडकाफडकी बदल्यांचे आदेश दिले आहेत. या प्रशासकीय कारवाईमुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (Bharati Vidyapeeth Police Station) हद्दीत काही अल्पवयीन आरोपींना कारच्या बोनेटवर बसवून त्यांची धिंड काढण्यात आली होती. या गंभीर प्रकारामुळे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. राज्य मानवाधिकार आयोगाने या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेत पुणे पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. याशिवाय, याच पोलीस ठाण्यात आरोपींना बेकायदेशीररीत्या डांबून मारहाण केल्याचा आरोपही समोर आला होता, ज्यामुळे पोलिसांच्या अडचणी आणखी वाढल्या. सीआयडी मार्फत अल्पवयीन मुलांच्या धिंड प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी सुरू होती. या चौकशीत दोषी आढळल्यानंतर संबंधित पोलिसांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये ३ पोलीस उपनिरीक्षक आणि १ सहायक पोलीस निरीक्षकाचा समावेश आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या ४ अधिकाऱ्यांची विशेष शाखेत तर ११ पोलीस अंमलदारांची पोलीस मुख्यालयात बदली केली आहे.
कारवाई झालेल्या अधिकारी व कर्मचारी
सहायक पोलीस निरीक्षक: स्नेहल संभाजी थोरात, पोलीस उपनिरीक्षक: निलेश राजेंद्र मोकाशी, अण्णा मधुकर दराडे, सद्दाम हुसैन दस्तगीर फकीर तसेच, पोलीस मुख्यालयात बदली झालेले अमलदारांमध्ये सुनील दादा हनवते, दिनेश विनायक तापकीर, मितेश दत्तात्रय चोरमले, सागर चंद्रकांत बोरगे, सोहम कैलास शेंडकर, मंगेश जयसिंग पवार, राहुल अशोक औंधकर, रवींद्र शंकर गायकवाड, संदीप लक्ष्मण आगळे, तुकाराम पंडित सुतार आणि सुवर्णा दत्तात्रय भिसे आदींचे नावे आहेत.
मोठी बातमी, आयकर विभागाच्या रडारवर अभिनेत्री रकुल प्रीत सिंग; 12 ठिकाणी छापे –
दरम्यान, मानवाधिकार आयोगाचा वचक, सीआयडीचा सखोल तपास आणि त्यानंतर झालेली ही मोठी प्रशासकीय कारवाई यामुळे पुणे पोलिसांमधील शिस्तीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सीआयडीच्या पुढील तपासात या प्रकरणात आणखी कोणकोणते नवे धागेदोरे हाती लागतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
