Pune Politics : शरद पवार पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी मतदारसंघातून तुतारी केली गायब

Bapusaheb Pathare :  महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तिकिटाच्या अपेक्षेने एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांची कमालीची संख्या

Bapusaheb Pathare

Bapusaheb Pathare

प्रतिनिधी :  विष्णू सानप

Bapusaheb Pathare :  महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तिकिटाच्या अपेक्षेने एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांची कमालीची संख्या वाढली आहे. मात्र ज्या पक्षाने आपल्याला आमदार केलं त्या पक्षाची निशाणीच आपल्या हक्काच्या प्रभागातून गायब करण्याचं काम शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील एकमेव आमदार बापूसाहेब पठारे यांच्याकडून होतांना दिसत आहे. बापूसाहेब पठारे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून पुण्यातील एकमेव आमदार म्हणून निवडून आले आहेत, मात्र त्यांच्या कुटुंबातील मुलगा, सूनबाई आणि भाचे मंडळी भाजपमध्ये गेले आहेत.

पठारे यांचा मुलगा सुरेंद्र पठारे यांना प्रभाग क्रमांक 4 मधून भाजपकडून उमेदवारी निश्चित झाली आहे. तर त्यांच्या सूनबाई ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांना प्रभाग 3 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर पठारेंचे भाचे संतोष भरणे यांच्या पत्नीलाही प्रभाग क्रमांक 4 मधून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे खराडी – वाघोली प्रभाग 4 मध्ये सुरेंद्र पठारे, तृप्ती संतोष भरणे, संदीप सातव आणि सत्यजित बनसोडे यांची उमेदवारी निश्चित केली आहे. तर शेजारील विमाननगर प्रभाग 3 मध्ये ऐश्वर्या सुरेंद्र पठारे, प्रीतम खांदवे, रामभाऊ दाभाडे, अनिल सातव आदी उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे हेच आमदार साहेब राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत होते. मात्र त्यांच्याच कुटुंबातील सदस्य भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.

बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) खराडी या गावातील सरपंच, नगरसेवक राहिले होते. मात्र आता त्यांच्या कुटुंबातील सदस्य इतर पक्षातून निवडणूक लढवत असल्याने त्यांचं या भागातील वजन कमी झालंय का? किंवा हक्काच्या प्रभागात स्वतःचापक्ष वाढवायच नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. एका बाजूला भाजपचे नेते, आमदार पक्ष वाढीसाठी आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे पुण्यातील एकमेव आमदार असलेले बापूसाहेब पठारे यांच्या मतदारसंघातून पक्ष चिन्ह तुतारीच गायब झाल्याचे चित्र आहे. ज्या पक्षातून आणि निशाणीवर आपण आमदार झालो त्या पक्षातून किंवा निशाणीवर आपल्या घरातील सदस्य उभे न राहता कट्टर विरोधक असलेल्या भाजपमधून निवडणूक लढवत आहेत त्यामुळे पठारे यांना आपल्या पक्षावर विश्वास नाही का? आणि पक्षातील निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार पठारे यांना नैतिकता देते का? यावर देखील पक्षात कुजबूज सुरू झाली आहे.

बापू पठारे यांचा पक्षांतराचा इतिहास पाहिला तर आपल्याला ते असे का करतात याचं आश्चर्य वाटणार नाही. ते आधी काँग्रेस मध्ये होते , नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, 2019 विधानसभा प्रचाराच्या वेळी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपामध्ये उडी घेतली. त्यांनंतर च्या विधानसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला. आता त्यांचे सारे कुटुंब भाजपामध्ये गेले आहेत, असा एकूण पाठारेंचा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांनी याबाबत आपला मुद्दा मांडला असताना मुलगा स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास सक्षम असल्याचे सांगत आपण मात्र तुतारीचा किंवा तुतारी सोबत असलेल्या पक्षाचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले होते. पण त्यांच्यात स्वतःच्या घरच्या खराडी या प्रभागामध्ये त्यांचा मुलगा सुरेंद्र हा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे.

अहिल्यानगरमध्ये आम्ही एकत्र, महायुतीमध्ये बिघाड, महाविकास आघाडीला फायदा; लंकेंनी स्पष्ट केली भूमिका

तर त्यांची सून ऐश्वर्या सुरेंद्र पठारे या शेजारच्या विमान नगर– वाघोली या प्रभागातून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, भाजपने आमदार किंवा खासदार यांच्या नातेवाईकांना जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे. पण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार असलेल्या बापू पठारे यांच्या घरातील मुलगा आणि भाचे, सून या तिघांनाही भाजपने उमेदवारी दिली आहे. आता बापूसाहेब पठारे हे कोणाचा प्रचार करणार हे पाहणे औत्सुक्याच ठरणार आहे.

Exit mobile version