Pune Rain : काल रात्रीपासून पुण्यात मुसळधार पाऊस (Heavy rain) पडत आहे. या पावसामुळे पुण्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. अशातच उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar यांनी पुण्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली, नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.
पुण्यात पावसाचा हाह:कार; जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितला ग्राउंड रिपोर्ट
पाण्याचा विसर्ग वाढणार
अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढणार आहोत. सगळ्या धरणाचे जिथे कॅनाल आहेत ते सोडायला सांगितले आहेत. जेणेकरून रात्रीतून जास्त पाऊस झाला तरी ते पाणी धरणामध्ये साठवता येईल. पाणी सोडायचे असेल तर आताच काही प्रमाणात सोडा. रात्री उशिरा पाणी सोडल्यास नागरिकांना त्रास होईल, रात्री ७ नंतर विसर्ग वाढवण्यात येऊ नये, अशा सूचना त्यांनी दिल्या.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचंही या परिस्थितीवर लक्ष आहे. फूड पॉयझनिंग कोणाला होऊ नये, याची दक्षता घेतली गेली आहे. मुळशी धरणही भरले आहे. त्यामुळे तेथे वीज निर्मितीसाठी सांगितलं आहे. पिंपरी चिंचवडमध्येही अलर्ट राहायला सांगितलं. सिंहगड रोडवर लष्कराची तुकडी आणि एनडीआरएफची टीम तैनात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पण, सतर्क राहावं, असं आवाहन अजित पवारांनी केलं.
धबधबे पाहण्यासाठी लोकांना उत्साह असतो. पण त्यांना माझं आवाहन आहे की, २ दिवस तिथे जाऊ नका. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही भागातील वाहतूक बंद करण्यात आली. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं. शक्यतो, घराबाहेर पडू नका, काळजी घ्या, असंही आवाहन त्यांनी केलं.
पुण्यातील ३ जणांचा डेक्कन भागात मृत्यू झाला आहे. जे जखमी झाले आहेत, त्यांचा खर्च शासन आणि महापालिका करेल, असंही अजित पवार म्हणाले. ज्या सोसायटी टाक्यांमध्ये पाणी शिरले आहे, त्यांना टँकरने पाणी दिले जाईल. पुण्यातील वारजे भागात म्हशी ज्या मृत्युमुखी पडल्या आहेत त्याचे सुद्धा पंचनामे केले जाणार आहेत, असं अजित पवार म्हणाले. याळेळी पुरामुळे प्रभावित भागातील नागरिकांना अन्न व पाणी देण्याचे निर्देश त्यांनी दिले.