Pune Rain News : मागील काही दिवसांपासून कधी पाऊस तर कधी ऊन असंच काहीसं वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यात पावसाने काहीसी उघडीप दिल्याने ढगाळ हवामान सुरु असल्याचं दिसून येत आहे. घाटमाध्यावर पावसाच्या सरी पडत असल्याने पुढील दोन दिवस पुण्यात अशीच परिस्थिती असेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
UNSC मध्ये स्थायी सदस्यत्वासाठी भारताचा दावा मजबूत, G-20 साठी आलेल्या नेत्यांचा पाठिंबा
मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील काही भागांत पाऊस तर कडक ऊन पडत असल्याचं दिसून आलं होतं. अशात आता ऊन आणि ढगाळ हवामानामुळे पुण्यात दमट वातावरण निर्माण झालं आहे, या वातावरणामुळे पुण्यात चांगलीच गरमी वाढत आहे.
पुण्यासारखीच विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात पावसाने उघडीप घेतली असून मंगळवारी (ता. १२) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान, मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे सक्रिय असून, जैसलमेर, कोटा, गुना, सागर, पेंद्रारोड, बालासोर ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. वायव्य मध्य प्रदेश परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, दक्षिण छत्तीसगड ते आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.