पुण्यातील श्री बालाजी विद्यापीठावर प्रशासक मंडळ नियुक्ती; उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्णय

Shri Balaji University:

Dr. Parag Kalkar

Dr. Parag Kalkar

Shri Balaji University : पुण्यातील ताथवडे येथील श्री बालाजी विद्यापीठ हे स्वयं-अर्थसहाय्यित विद्यापीठ आहे. या विद्यापीठाच्या ट्रस्टमधील अंतर्गत वादामुळे दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम झाला होता. आता या प्रकरणासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.डिसेंबर 2024 मध्ये संस्थेच्या संस्थापक अध्यक्षांच्या निधनानंतर, त्यांच्या पत्नी बी. थिलागावती यांची अध्यक्षपदी झालेली निवड कायदेशीरदृष्ट्या वादात सापडली होती. या प्रकरणात राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते.

न्यायालयाच्या निर्णयानुसार या प्रकरणात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप केला. विद्यापीठाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी शासनाने उच्च न्यायालयात आपली बाजू प्रभावीपणे मांडली. त्यानंतर उच्च न्यायालयाने या प्रकरणात विद्यापीठावर प्रशासक मंडळ नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

नियुक्त प्रशासक मंडळामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर यांची मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी डॉ. चारुशीला गायके आणि सीओईपीचे अधिष्ठाता पराग सदगीर यांची प्रशासक मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर मंडळाने तात्काळ विद्यापीठाची सूत्रे हाती घेतली. तसेच, विद्यापीठाच्या प्रश्नांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थांची आंदोलनस्थळी घेऊन संवाद साधत, त्यांच्या समस्या व प्रश्न समजून घेतले. या सकारात्मक पावलामुळे येत्या विद्यापीठाचे दैनंदिन शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज पूर्णपणे सुरळीत होईल, असा विश्वास निर्माण झाला आहे.

Exit mobile version