Sharad Pawar Return Gift To Sanjay Kakade : पुणे विधान परिषद निवडणुकीत विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड ही केवळ आजच्या राजकीय तडजोडीचा भाग नाही, तर त्यामागे 14 वर्षांपूर्वीच्या एका राजकीय धोरणी निर्णयाची ‘कडी’ जोडलेली आहे. 2012 च्या राज्यसभेच्या निवडणुकीत संजय काकडे यांनी शरद पवारांसाठी जो त्याग केला होता, त्याचीच परतफेड आज पवारांनी विक्रम काकडे यांच्या मार्गातील काटे दूर करून केल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. नेमकं 14 वर्षांपूर्वी संजय काकडेंनी शरद पवार यांच्यासाठी असं काय केलं होतं? ज्याची पवारांनी आज परत फेड केली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया…
2012 ची ती ऐतिहासिक माघार
2012 मध्ये जेव्हा राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका होत्या, तेव्हा संजय काकडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. त्यावेळी शरद पवार यांनी त्यांना उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली होती, जेणेकरून निवडणुका बिनविरोध पार पडतील. पवारांच्या या विनंतीनुसार, संजय काकडे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती. त्यावेळी आपल्याला शरद पवार यांच्या विरोधात किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवायची नसल्याचे काकडे यांनी स्पष्ट केले होते.
अपक्ष म्हणून राजकीय एन्ट्री अन् राज्यसभा (2014 – 2020)
त्यानंतर 2014 च्या राज्यसभेच्या निवडणुकीत मात्र संजय काकडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नव्हता. उलट, त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती आणि ते निवडूनही आले होते. 2014 मध्ये शरद पवार आणि इतर उमेदवार बिनविरोध निवडून आले होते, परंतु संजय काकडे यांनी स्वतः या निवडणुकीत सहभाग घेऊन विजय मिळवला होता.
विक्रम काकडेंना उमेदवारी पण, संजय काकडे कसे अडकले राष्ट्रवादीच्या ट्रॅपमध्ये?
राजकारणातील ‘गिव्ह अँड टेक’
आज पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीतील घडामोडींकडे पाहिल्यास, राजकारणात कोणतीही कृती व्यर्थ नसते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शरद पवार हे त्यांच्या ‘स्मृती’ आणि ‘संबध टिकवून ठेवण्याच्या’ कौशल्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे पुणे विधान परिषदेच्या जागेवर जेव्हा पेच निर्माण झाला, तेव्हा पवारांनी केवळ विक्रम काकडेंचा मार्ग मोकळा केला नाही, तर 2012 मध्ये काकडे यांनी दाखवलेल्या सामंजस्याची जाणीव ठेवत श्रीकांत पाटील यांना माघाऱ घ्यायला लावत एक मोठे राजकीय उदाहरणही घालून दिले आहे. संजय काकडे यांनी 2012 राज्यसभेवेळी दाखवलेली लवचिकता आणि आज शरद पवारांनी घेतलेली ‘बॅकफूट’ या दोन्ही गोष्टी पुण्याच्या राजकारणातील ‘परिपक्वतेचे’ दर्शन घडवत असल्याचे आणि बिनविरोध होत विक्रम काकडेंनी वडील संजय काकडे यांचाच कित्ता गिरवल्याची चर्चाही यामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे.
