‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किट

Punit Balan आषाढी वारीच्या कालावधीत बंदोबस्तासाठी येणारे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुनीत बालन ग्रुप’कडून जीवनावश्यक वस्तूंचे कीट

Punit Balan Ashadhi Wari Kit Donation

Punit Balan Ashadhi Wari Kit Donation

पुणे : पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या कालावधीत बंदोबस्तासाठी येणारे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी पुनीत बालन ग्रुप’कडून जीवनावश्यक वस्तूंचे ९ हजार कीट देण्यात आले आहेत. या किटमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश असल्याने वारीच्या बंदोबस्ताच्या कालावधीतील पोलीस बांधवाची गैरसोय टळणार आहे आणि परिणामी त्यांना दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना अधिक चांगली सेवा देता येणार आहे.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्यासह अन्य संताच्या पालखी समवेत लाखो वारकरी पंढरपुरमध्ये दर्शनासाठी येत असतात. १५ ते १९ जुलै या कालावधीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही सातारा जिल्ह्यातून मार्गक्रम करत असते.

लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या भागातून पालखीचे मार्गक्रमण होत असताना २७०० पुरुष पोलिस आणि ३०० महिला पोलिस बंदोबस्तासाठी असतात. त्यांच्यासाठी ३ हजार कीट उपलब्ध करुन देण्याची विनंती सातारा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आली होती. तसेच २५ जुलै रोजी पंढरपुरात भरणाऱ्या आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज या प्रमुख पालख्यांसह राज्यभरातील शेकडो पालख्या आणि दिंड्या पंढरपुरात दाखल होत असतात.

या सोहळ्यात सहभागी होऊन विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी वैयक्तिक पातळीवर येणाऱ्या भक्तांचीही मोठी संख्या असते. या सर्वांच्या बंदोबस्तासाठी पंढरपुरात ६ हजार ५०० पुरुष पोलिस तर २००० महिला पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. त्यांनाही अशाच प्रकारच्या साहित्याचे किट उपलब्ध करुन देण्याची विनंती पंढरपूर उपविभागीय कार्यालयाकडून युवा उद्योजक पुनीत बालन यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार बालन यांनी तत्काळ हे कीट उपलब्ध करून दिले आहेत. त्यानुसार सोलापूर ग्रामीण पोलिस दलासाठी ७ हजार तर सातारा ग्रामीण पोलिस दलासाठी २ हजार असे एकूण ९ हजार कीट उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

किटमध्ये कोण-कोणत्या वस्तू

कोलगेट पाऊच, टुथब्रश, पॅराशूट तेल बॉटल, ओडोमास, ग्लुकोज, डेटॉल साबण, शेंगदाणा चिक्की, कापडी मास्क, पाणी बॉटल आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटरी पॅड अशा गोष्टींचा समावेस आहे.

पोलिसांची सेवा करण्याची संधी मिळाली हेच समाधान

“यंदा पालखीच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाने हजेरी लावली आहे. पण अशाही परिस्थिती पोलिस बांधव हे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची अत्यंत काटेकोरपणे सुरक्षा व्यवस्था बघण्याचं महत्त्वाचं कार्य करत असतात. ही एकप्रकारे सेवाच असून ही सेवा करत असताना त्यांचीही कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांच्या मागणीनुसार दैनंदिन वस्तूंचे कीट देण्यात आले आहे. मागील वर्षीही पोलिस बांधवांची या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली होती. मागील वर्षीप्रमाणे यंदाही ही संधी मिळाली, याचं मनापासून समाधान आहे. अशी प्रतिक्रिया युवा उद्योजक पुनीत बालन यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version