आषाढी वारीत रोजगार हमी विभागाची ‘संवाद वारी’; मंत्री भरत गोगावले यांची उपक्रमाला भेट

मंत्री भरत गोगावले यांनी शिवसेनेतर्फे उभारण्यात आलेल्या ‘आनंदवारी’ भाविक सुविधा केंद्रालाही भेट दिली.

News Photo   2026 07 25T200459.148

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर (Ashadi) राज्याच्या रोजगार हमी विभागातर्फे ‘संवाद वारी’ या जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. रोजगार हमी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. यावेळी ‘व्ही.बी.जी. रामजी योजना’सह विविध योजनांची माहिती चित्ररथ, माहितीपर फलक आणि पथनाट्याच्या माध्यमातून वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली.

या उपक्रमाला रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी भेट देऊन पाहणी केली. तरुण कलाकारांनी सादर केलेले पथनाट्य त्यांनी आवर्जून पाहिले. योजनांची माहिती प्रभावी आणि लोकाभिमुख पद्धतीने मांडल्याबद्दल त्यांनी कलाकार व विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे शासनाच्या योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते, असे त्यांनी यावेळी सांगितले.

पांडुरंगा तुच माझा; दुजा कुणी नाही; कडक भक्ती युट्यूबवर नवीन भक्तिगीत

दरम्यान, मंत्री भरत गोगावले यांनी शिवसेनेतर्फे उभारण्यात आलेल्या ‘आनंदवारी’ भाविक सुविधा केंद्रालाही भेट दिली. यावेळी त्यांनी आनंदवारी शाखेचे उद्घाटन केले आणि तेथे उपस्थित वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या सोयी-सुविधांची माहिती घेतली. वारकऱ्यांच्या सेवेसाठी उभारण्यात आलेल्या विविध सुविधांची त्यांनी पाहणी केली.

सेवाभावाचा संदेश देत मंत्री गोगावले यांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या काही वारकऱ्यांच्या पायांना मालिश करून त्यांची विचारपूस केली. त्यांच्या या कृतीचे उपस्थित वारकरी आणि स्वयंसेवकांनी स्वागत केले. आषाढी वारीत शासनाच्या योजनांची जनजागृती आणि वारकऱ्यांची सेवा यांचा संगम घडवून आणण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आल्याचे यावेळी अधोरेखित झाले.

follow us