Download App

Radhakrishna Vikhe Patil : पटोले-थोरात वादात विखे पाटलांनी टाकली काडी!

पुणे : नाशिक पदवीधर मतदारसंघातील (Nashik Graduate Constituency) नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत धूसफूस चव्हाट्यावर आली आहे. सत्यजित तांबे (satyajeet tambe) यांच्या उमेदवारीवरुन नाराज झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधिमंडळ नेते पदाचा राजीनामा दिला आहे. यावरुनच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी थोरातांना लक्ष केले आहे.

बाळासाहेब थोरात हे विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते होते. काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहे. नाशिक मतदार संघातून महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे होती. मात्र, निवडणूक झाल्यानंतर अनेक मुद्दे उपस्थित करायचे. पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आणायचा, हे योग्य नाही, अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या ग्लोबल कृषी जिल्हा महोत्सव २०२३, पीक प्रात्यक्षिके, कृषी प्रदर्शन व पिक परिसंवादाचे उदघाटन, आज दुपारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी महसूल मंत्री विखे पाटील यांच्याशी संवाद साधला.

महसूल मंत्री विखे पाटील म्हणाले की, ‘नाशिक मतदार संघातून सत्यजित तांबे विजयी झाले. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला आहे. थोरात यांनी राजीनामा दिलाय, ते व्यथित झालेत, त्यांनी भावनिक आवाहन केले आहे. यापेक्षा महाविकास आघाडीचा उमेदवार नाशिक मतदारसंघातून पराभूत होतोय.’

‘काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहे. थोरात हे विधिमंडळ काँग्रेसचे नेते होते. मतदार संघातून महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे होती. मात्र, निवडणूक झाल्यानंतर अनेक मुद्दे उपस्थित करायचे. पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आणायचा हे योग्य नाही’, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

पक्षांतर्गत वाद पक्ष नेतृत्व पाहिल. पक्षाच्या अंतर्गत वादाबद्दल ते जर निवडणूक काळात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी बोलले असते तर मला वाटते लोकांनी त्यांचे स्वागत केले असते.

बाळासाहेब थोरात यांचे राजकीय भवितव्य काय, भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागत करणार का या बाबत पत्रकारांनी विचारले असता विखे पाटील म्हणाले भाजपमध्ये यायचे किंवा काय हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत त्यांनाच तुम्ही विचारावे, असे सांगून या प्रश्नाला त्यांनी बगल दिली.

Tags

follow us