पुणे : वंचित बहुजन आघाडी (VBA) महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकी संदर्भात चर्चा झाली. कसबा पोटनिवडणूक काँग्रेस लढत आहे असं दिसतंय. परंतु, काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडून अजूनही वंचित बहुजन आघाडीकडे कसबा मतदारसंघात पाठिंबा द्यावा, असे विनंती पत्र आलेले नाही म्हणून कसबा पोटनिवडणूकी संदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, चिंचवड पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll) अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांना पक्षाने पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर (Rekha Thakur) यांनी जाहीर केले आहे.
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची दुरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे) बैठक घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड मध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल कलाटे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांना त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला होता. आणि त्यांनी १ लाख १२ हजार मते त्यावेळी घेतली होती. राहुल कलाटे हे शिवसेनेचे सभागृहाचे नेते आहेत. म्हणून ही जागा शिवसेनेने लढवावी आणि राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात यावी असा आमचा आग्रह होता. परंतु तसे घडले नाही.
गौप्यस्फोटामुळे महाविकास आघाडी मध्ये परिस्थिती बदललेली आहे. वंचित बहुजन आघाडी पूर्ण विचार करून बीजेपीला पिपरी-चिंचवड मतदारसंघात कोण थांबवू शकले तर राहुल कलाटे थांबवू शकतात या मताला आली आहे. वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारिणी एकमताने राहुल कलाटे यांच्या पाठीशी उभे राहील. यादृष्टीने पाठींबा देऊन निवडून आणण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड मधील मतदारांना वंचित बहुजन आघाडी करत आहे.