नवीन प्रभाग केवळ कागदावर नको, मनुष्यबळ अन् यंत्रणा द्या; राहुल कलाटेंची महापालिका प्रशासनाकडे मागणी

नवीन प्रभागांची निर्मिती केवळ कागदावर न राहता त्या प्रभागांना सक्षम मनुष्यबळ आणि आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

Untitled Design   2026 09 03T192746.754

Untitled Design 2026 09 03T192746.754

Rahul Kalate’s demand to the municipal administration : पिंपरी चिंचवड महापालिकेने नवीन प्रभाग रचना जाहीर केली असली, तरी त्यानुसार अद्याप प्रभागनिहाय अधिकारी, सफाई कामगार, फवारणी कामगार तसेच आवश्यक साधने व उपकरणांचे योग्य नियोजन आणि वाटप झालेले नाही. त्यामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्था आणि कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नवीन प्रभागांची निर्मिती केवळ कागदावर न राहता त्या प्रभागांना सक्षम मनुष्यबळ आणि आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, अशी मागणी नगरसेवक राहुल कलाटे यांनी केली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 2 सप्टेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत कचरा आणि स्वच्छता व्यवस्थेच्या प्रश्नावर भूमिका मांडताना राहुल कलाटे यांनी प्रशासनासमोर महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे स्वरूप वेगवेगळे असून त्यानुसार त्याचे संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया आणि विल्हेवाट यांचे नियोजन होणे आवश्यक आहे. त्यामुळे कचऱ्याच्या प्रश्नाकडे केवळ एखाद्या परिसराचा प्रश्न म्हणून न पाहता संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराचा प्रश्न म्हणून एकात्मिक पद्धतीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे कलाटे यांनी स्पष्ट केले.

मोशी येथील दुर्दैवी दुर्घटनेनंतर कचरा डेपोच्या जागेवरून सुरू असलेल्या राजकारणावरही राहुल कलाटे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, कचऱ्याच्या प्रश्नावर नागरिकांची दिशाभूल करणारे राजकारण करण्यापेक्षा त्या त्या वेळची परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. मोशी येथील कचरा डेपोचे नियोजन ज्या काळात (१९९१ साली) करण्यात आले, त्या वेळी हा परिसर शहराच्या मुख्य नागरी वस्तीजवळ नसलेला आणि तुलनेने विरळ लोकवस्तीचा भाग होता. मात्र, ताथवडे-पुनावळे परिसरात कचऱ्याच्या आरक्षणाचा विचार होत असताना आजची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. आज हा परिसर मोठ्या प्रमाणावर विकसित झालेला आणि घनदाट नागरी वस्तीचा भाग आहे. त्यामुळे पूर्वीचे निर्णय आणि आजची परिस्थिती यांची तुलना करताना वस्तुस्थिती लक्षात घेणे गरजेचे आहे.

दादांच्या जाण्याचं राजकारण नको; रोहित पवार, सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवारांनी फटकारलं

“कचऱ्याच्या जागेवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा नागरिकांच्या आरोग्याचा, सुरक्षिततेचा आणि भविष्यातील शहर नियोजनाचा विचार करून निर्णय घेतले पाहिजेत. आजची परिस्थिती काय आहे, भविष्यात शहराचा विस्तार कसा होणार आहे आणि नागरिकांच्या हितासाठी कोणता पर्याय योग्य आहे, याचा सर्वंकष विचार झाला पाहिजे,” असे राहुल कलाटे यांनी सांगितले.

कचऱ्याचा प्रश्न हा मोशीचा, पुनावळेचा किंवा कोणत्याही एका भागाचा प्रश्न नाही; तो संपूर्ण पिंपरी चिंचवडचा प्रश्न आहे. त्यामुळे पक्षीय किंवा स्थानिक राजकारण बाजूला ठेवून शहर म्हणून त्यावर कायमस्वरूपी आणि शास्त्रीय उपाययोजना करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळवून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असेही कलाटे यांनी स्पष्ट केले.

नवीन प्रभागांना सक्षम यंत्रणा, योग्य मनुष्यबळ आणि आवश्यक साधनसामग्री देऊन स्वच्छता व्यवस्थेचे तातडीने नियोजन करावे आणि कचरा व्यवस्थापनासाठी संपूर्ण शहराचा एकात्मिक आराखडा तयार करावा, अशी मागणी राहुल कलाटे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली.

Exit mobile version