पुणे: राज्यात मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ म्हणजे एमडी सहज मिळू लागले आहे. पुण्यात (Pune) तर या अंमली पदार्थाने विळखा घातलाय. पुण्यात अंमली पदार्थ कसे येतात, कुठून येतात यासंबंध आंतरराज्यीय टोळी पोलिसांनी उघडकीस आलीय. राजस्थानमधून (Rajasthan) व्यवसायासाठी आलेल्या काही तरुणांनी हे ड्रग्सचे रॅकेट चालविले होते. आता हे रॅकेट चालविणारे आणि ड्रग्सचा पुरवठा करणाऱ्यांची साखळीचे पुणे पोलिसांनी (Pune Police) उघडकीस आणली आहे. तब्बल 4 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स आणि सहा आरोपींना पोलिसांनी अटक केलीय.
गिफ्ट शॉपी आडून एमडीची विक्री
तेरा दिवसांपूर्वी पुण्यातील खराडी भागातील दोघांकडून एक कारमधून 27 ग्रॅम एमडी हा पदार्थ जप्त करण्यात आला होता. दोघांविरुद्ध खराडी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला होता. एमडीचा पुरवठा करणाऱ्या शोध घेतला. त्यात मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित व हरिष सुजना रामदेवासी या तरुणांना ताब्यात घेण्यात आले. राजपुरोहित हा गिफ्ट शॉपी, तर हरिष रामदेवासी हा मोबाइल शॉप चालवित होते. हे दोघे मुळचे राजस्थानचे आहे. व्यावसायाच्या आडून दोघांना हा गोरखधंदा सुरू केला होता. गेल्या वर्षभरापासून ते एमडी अंमली पदार्थ पुण्यात विकत होते. हा माल ते राजस्थानमधून मागवत होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात योगेश उर्फ मनीष बाबुराव बिष्णोई हा राजस्थानमधून अंमलीपदार्थ घेऊन पुण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत बिष्णोई याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 151 ग्रॅम एमडी म्हणजे तब्बल तीस लाख रुपये किंमतीचे एमडी जप्त केले होते. त्यानंतर त्याचा मावसभाऊ सचिन उर्फ एसके रमेशकुमार बिष्णोई याला पुण्यात अटक करण्यात आली. त्याने पुण्यातील मांजरी बुद्रुक येथील अमित सुनील घुले याला एमडी अंमली पदार्थ विक्री केल्याची माहिती मिळाली. घुले याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून फॉर्च्युनर गाडीत 398 ग्रॅम एमडी पदार्थ जप्त केला. त्याची किंमत 79 लाख रुपये आहे.
पाळेमुळे शोधत मुख्य आरोपी गजाआड
पुण्यात कारवाई झाल्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Pune Commissioner Of Police Amitesh Kumar) यांनी पाच अधिकारी आणि 20 कर्मचारी असे पथकाला टोळीचे रॅकेट शोधण्यास सांगितले. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या नेतृत्वाखाली पथक हे थेट राजस्थानात गेले. अंमली पदार्थाचा मुख्य वितरक रतनलाल किष्णाराम जाठ याला अटक केली. हा आरोपी केवळ वीस वर्षांचा आहे. त्याच्याकडून तब्बल पावणे तीन कोटींचे एमडी अंमलीपदार्थ जप्त केलाय. त्याचबरोबर या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी रामकरण जाट उर्फ चौधरी उर्फ सियाग याला अटक करण्यात आली आहे.
