पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जागी त्यांचेच निकटवर्तीय रणजीत तावरे यांची पुणे (Pune) जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी वर्णी लागली आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज (8 नोव्हेंबर) या जागेसाठी निवडणूक पार पडली. यात तावरे यांची निवड झाली आहे. रणजीत तावरे हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांचे पुतणे आहेत. याशिवाय अजित पवार यांचेही ते अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. (Ranjit Taware has been appointed as the Director of Pune District Co-operative Bank)
मागील 32 वर्षापासून अजित पवार जिल्हा बँकेचे संचालक होते. काही काळ ते बँकेचे अध्यक्ष देखील होते. बारामती तालुका अ वर्गातून ते निवडणूक लढवत होते. 1991 साली ते पहिल्यांदा जिल्हा बँकेचे संचालक झाले होते. बँकेला राज्यात प्रथम आणण्यात अजित पवार यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी कामाच्या व्यापामुळे बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले होते.
त्यानंतर अजित पवार यांच्या जागी त्यांचे पुत्र पार्थ पवार यांची बँकेच्या संचालक पदावर वर्णी लावत त्यांना राजकारणात सक्रीय केले जाणार असल्याचे बोलले जात होते. पार्थ यांनी यापूर्वी निवडणूक लढवली होती मात्र, यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर ते राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसे लांबच गेले. मात्र संचालकपदी वर्णी लावत त्यांना राजकारणात पुन्हा सक्रिय करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जात होते.
अशात नवीन संचालक कोण याबाबत अजित पवार अंतिम निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट होते. मात्र पार्थ पवार यांना संधी न देता रणजीत तावरे यांची संचालकपदी वर्णी लागली आहे. रणजीत तापरे हेही मागील अनेक वर्षांपासून राजकारणात विविध पातळ्यांवर सक्रिय आहेत. तरुण नेते म्हणून बारामतीच्या राजकारणात त्यांना ओळखले जाते.