पुणे : मागील १५ दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष कसबा पेठ पोटनिवडणुकीवर लागले आहे. त्याला कारण तसेच आहे. भाजप (BJP) हेमंत रासने आणि महाविकास आघाडीच्या (MVA) रवींद्र धंगेकर या दोन्हीही उमेदवारांमध्ये प्रचंड चुरस या पोटनिवडणुकीदरम्यान पाहायला मिळाली. रोज आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. अशातच मतदान होऊन जेमतेम एक दिवसच झाला आहे. प्रत्यक्ष मतमोजणी गुरुवार (दि. २) मार्च रोजी होणार आहे. पण दोन दिवस अगोदरच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांची आमदारपदी (MLA) निवड झाल्याचे फ्लेक्स पुण्यात लावण्यात आले आहे. त्यामुळे कॉन्फिडन्स असावा तर धंगेकर यांच्यासारखा… दोन दिवस आधीच विजयाचा फलक लावल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, सिंहगड रस्त्यावरीस वडगाव बु. येथील फलक लावल्यानंतर आवघ्या दोन तासातच ते काढण्यात आले.
कसबा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सुनील केदार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी ‘रोड शो’ तसेच चौकचौकात कोपरा सभा, रॅली, वेगवेगळ्या समाजाचे मेळावे, व्यापारी मेळावे घेऊन जोरदार प्रचार केला.
40 गद्दार आमदारांनी आईच्याच पाठीत खंजीर खुपसला; ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांची टीका
तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी दस्तूरखुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सभा, बैठका, रोड शोच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करत प्रचार केला. कसब्याची ही पहिलीच निवडणूक असेल ज्यात राज्याचे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही अगदी गल्ली बोळात जाऊन प्रचार केला. व्यापारी मेळावे, वेगवेगळ्या समाजाचे मेळावे घेतले.