पुणे : मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची शहराच्या राजकारणात पहिल्यांदाच एन्ट्री झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मनसेने (MNS) तयारी सुरु केली असून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे लोकसभा मतदारसंघनिहाय जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. त्यानुसार यात पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी थेट अमित ठाकरेंच्या खांद्यावर सोपविली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अमित ठाकरे यांची पुण्यात कसोटी लागताना दिसणार आहे. (Responsibility of Pune Lok Sabha constituency has been given to MNS leader Amit Thackeray)
मागील काही महिन्यांपासून अमित ठाकरे पक्षात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. त्यांच्याकडे पक्षाचे युवा नेते म्हणून पाहिले जाते. 2017 च्या महापालिका आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान त्यांनी रोड शो, सभा या माध्यमातून आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. सध्या पक्षाच्या वाढीसाठी ते महाराष्ट्रात फिरत आहेत. विविध भागांतील दौऱ्यांच्या माध्यमातून ते कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहत आहेत. याशिवाय मुंबई आणि नाशिकमध्येही त्यांनी लक्ष घातले आहे. मात्र आता पुण्याची त्यांना पहिल्यांदाच मोठी आणि स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्ताने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध मनसे अशी तिरंगी लढतही पाहायाला मिळू शकते. अशी लढत झाल्यास त्याचा फटका महायुतीला बसू शकतो असे बोलले जाते. याचे कारण मनसेची आणि भाजपची एकच असलेली हिंदुत्वाची भूमिका. शिवसेनेच्या पोटातूनच जन्म झालेल्या मनसेचा आणि शिवसेनेचा मतदार एकच असल्याचे 2009 आणि 2014 च्या विधानसभा आणि लोकसभा मतदारासंघामध्ये दिसून आले होते. त्याचा फटकाही महायुतीला किमान 10 जागांवर बसला होता. आता मराठीसोबतच मनसेने हिंदूत्वाचाही पुरस्कार केल्याने मनसेच्या उमेदवारामुळे मतविभागणी झाल्यास त्याचा महायुतीच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
पुण्यात मनसेचा आजपर्यंत एकदाही आमदार आणि खासदार निवडून आला नाही. मात्र पुण्यातील मागील दोन लोकसभा आणि तीन विधानसभा आणि तीन महापालिका महापालिका निवडणुकांची आकडेवारी बघितल्यास मनसेची मोठी ताकद असल्याचे दिसून येते. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने 75 हजार मते घेवून तिसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती. त्याचा फटका अनिल शिरोळे यांना बसल्याचे दिसून आले होते. त्यानंतर 2014 मध्येही दीपक पायगुडे यांनी तिसऱ्या क्रमांकावर राहत तब्बल 93 हजार मते घेतली होती.
2019 ची लोकसभा निवडणूक मनसेने लढविली नव्हती. मात्र 2019 मध्ये मनसेचे उमेदवार किशोर नाना शिंदे यांनी एकट्या कोथरुड विधासनभा मतदारसंघातून तब्बल 79 हजार मते घेत भाजपचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विजयासाठी संघर्ष करायला लावला होता. याशिवाय शिवाजीनगर, कसाब विधासनभा मतदारसंघातही निर्णयाक मते असल्याचे दिसून आले होते. नुकत्याच पार पडलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतही मनसेने काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना पाठिंबा देत त्यांचा विजय सोपा केला होता.