अजितदादा शरद पवारांना पुन्हा भिडणार? बारामतीनंतर आता पुण्यात होणार शक्तिप्रदर्शन
पुणे : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनीही त्यांचे दौरे वाढविले आहेत. बारामती आणि बीडमधील सभांनंतर अजित पवार यांची आता 10 सप्टेंबरला कोल्हापूरमध्ये सभा होणार आहे. मात्र त्यापूर्वी ते पुण्यात शक्तिप्रदर्शन करणार आहेत. कोल्हापूरला निघण्यापूर्वी त्याच दिवशी अजितदादा पुण्यात रोड शोच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. (Ajit Pawar is going to make a power show in Pune on September 10 through a road show.)
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 10 सप्टेंबरला पुण्यात अजित पवार यांचा रोड शो होणार आहे. त्यांच्या ‘जिजाई’ निवासस्थानापासून रोड शोची सुरवात होणार आहे. जिजाई ते खेड-शिवापूर टोलनाका असा हा रोड शो होणार आहे. तिथून अजित पवार कोल्हापूरला रवाना होतील, असे नियोजन करण्यात आले आहे. पुण्याहून कोल्हापूरला जाणार असल्याने त्याच मार्गावर रोड शो होणार असल्याचे सांगितले जात आहे.
बीड आणि बारामतीला अजितदादांचे शक्तिप्रदर्शन :
यापूर्वी 26 ऑगस्ट रोजी अजित पवार यांनी बारामतीमध्ये जाहीर सभा घेतली होती. त्यासाठी लाखोंचा समुदाय जमला होता. यावेळी फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले होते. तर दुसऱ्यादिवशी बीडमध्ये जाहीर सभा झाली होती. शरद पवार यांच्या सभेनंतर काहीच दिवसात अजित पवार यांनी ही सभा घेतली होती. यावेळीही मोठ्या प्रमाणात लोकांनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर आता पुणे आणि कोल्हापूरमध्ये अजित पवार शक्तिप्रदर्शन करणार आहेत.