डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रेवण करोडी यांचा ‘उत्कृष्ट प्राध्यापक’ पुरस्काराने सन्मान!
DY Patil Pharmacy College; डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे डॉ. रेवण करोडी यांचा ‘उत्कृष्ट प्राध्यापक’ पुरस्काराने सन्मान.
DY Patil Pharmacy College: पिंपरी: आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या फार्माकोग्नोसी विभागाचे सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. रेवण करोडी यांना त्यांच्या संशोधनातील उल्लेखनीय कामगिरी, शैक्षणिक योगदान आणि महाविद्यालयाच्या विकासासाठी केलेल्या भरीव कार्याबद्दल महाविद्यालयातर्फे ‘उत्कृष्ट प्राध्यापक’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. विनायक जोशी यांच्या हस्ते तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि रु. 5,000 रोख पारितोषिक असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ. रेवण करोडी यांना औषधनिर्माणशास्त्र व संशोधन क्षेत्रातील 18 वर्षांहून अधिक अनुभव असून, त्यांचे 40 हून अधिक संशोधनपर शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या नावावर सात पेटंट प्रकाशित आहेत. तसेच त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधनपर पोस्टर आणि मौखिक सादरीकरणे केली आहेत. त्यांच्या संशोधनात्मक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वी ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ आणि ‘यंग रिसर्चर पुरस्कार’ यांसारख्या सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.
महाविद्यालयातील संशोधनविषयक उपक्रमांना चालना देण्यासाठी डॉ. करोडी यांनी पाच लाख रुपयांहून अधिक संशोधन अनुदान मिळविण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रायोजित कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करून त्यांनी संशोधन आणि शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
सांगलीत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस! वातावरण बदलले, शेतकरी मात्र मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत
शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. ते पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संशोधन आणि शैक्षणिक कार्यासाठी मार्गदर्शन करतात. संशोधनाभिमुख दृष्टिकोन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीची बांधिलकी आणि संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न यांद्वारे ते महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घालत आहेत.
त्यांच्या या बहुमोल योगदानाची दखल घेऊन डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातर्फे त्यांना ‘उत्कृष्ट प्राध्यापक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या गौरवाबद्दल संस्थेचे संकुल संचालक रिअर ॲडमिरल अमित विक्रम (निवृत्त) आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी डॉ. रेवण करोडी यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.