दिवाळीआधी FDA चा दणका! परभणीत 63 लाखांचा फरसाण जप्त, धाराशिवमध्ये 16 लाखांच्या गुटख्यावर कारवाई
दिवाळीच्या सणात अन्नपदार्थांची मागणी वाढत असताना नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींवर अन्न व औषध प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.
Major action by the FDA ahead of Diwali : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने राज्यात कारवाईचा धडाका लावला आहे. परभणीत मोती नमकीन या फरसाण उत्पादक कारखान्यावर छापा टाकून तब्बल 63 लाख 14 हजार रुपयांचा संशयित फरसाण साठा जप्त करण्यात आला आहे. तर धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे सुगंधित तंबाखू, पानमसाला आणि गुटख्याच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करत 16 लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिवाळीच्या सणात अन्नपदार्थांची मागणी वाढत असताना नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींवर अन्न व औषध प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत परभणी एमआयडीसी परिसरातील मोती नमकीन या फरसाण उत्पादक कारखान्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत तब्बल 22 हजार 550 किलो वजनाचा, 63 लाख 14 हजार रुपये किमतीचा संशयित मिक्स शेव आणि फरसाणचा साठा जप्त करण्यात आला. कारखान्यात तेलाच्या गुणवत्तेबाबत आवश्यक नोंदी नसणे, अस्वच्छता, किटकांचा प्रादुर्भाव आणि अन्नपदार्थांजवळ रासायनिक पदार्थांची साठवणूक अशा गंभीर त्रुटी आढळून आल्या.
जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच संबंधित कारखान्याचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे. प्रयोगशाळेच्या तपासणीनंतर अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.
रिलायन्स, ब्लिंकिट आणि झोमॅटोला एफडीएचा दणका! संचालकासह अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
धाराशिवमध्ये गुटख्यासह 16 लाखांचा मुद्देमाल जप्त
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अवैध वाहतुकीविरोधातही कारवाई करण्यात आली. एका इनोव्हा कारमधून सुगंधित तंबाखू, पानमसाला आणि गुटख्याची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. या कारवाईत प्रतिबंधित पदार्थ आणि वाहनासह एकूण 16 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
एकीकडे परभणीत लाखो रुपयांचा संशयित फरसाण साठा जप्त करण्यात आला आहे, तर दुसरीकडे धाराशिवमध्ये प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीवर कारवाई करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी मोहीम राबवली जात आहे. नागरिकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत काही तक्रार असल्यास 1800222365 या टोल-फ्री क्रमांकावर किंवा complaints.mahafda.in या पोर्टलवर तक्रार नोंदवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.