Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाती निधनाचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करत तपासाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत (Pawar) त्यांनी अपघातामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सांगितले. अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडताना त्यांनी त्यांच्या कामाची पद्धत, निर्णयक्षमता आणि राजकीय शैलीचा उल्लेख केला. दादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी आजही जाणवत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या प्रकरणात अपघात होता की त्यामागे घातपाताचा संशय आहे, याचा उलगडा होणे आवश्यक असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. काही प्रामाणिक व्यक्तींकडून आपल्यापर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवली जात असल्याचा दावा त्यांनी केला. संबंधित व्यक्तींना आपली ओळख उघड होण्याची आणि त्यांच्यावर कारवाई होण्याची भीती असतानाही त्यांनी माहिती दिल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. मात्र, या पत्रकार परिषदेतही चर्चेत असलेल्या मफलर मॅनची ओळख त्यांनी जाहीर केली नाही.
अजित पवार यांच्या निधनाला साडेनऊ महिने उलटूनही तपासातून ठोस माहिती समोर आलेली नसल्याबद्दल रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. तपासाबाबत अनेकांच्या मनात प्रश्न कायम असून, या प्रकरणातील प्रत्येक संशयाचा सखोल तपास व्हायला हवा, अशी त्यांची भूमिका आहे. विशेषतः सीआयडीकडे तपास सोपवण्यामागील उद्देश हा अपघातामागे घातपात होता का, याची पडताळणी करणे हाच असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी आपण केली नव्हती, असा खुलासाही रोहित पवार यांनी केला. अजित पवार यांच्या पक्षातील आमदारांनीच सीबीआय तपासाचा मुद्दा उपस्थित केला होता, असे त्यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांकडून विनंती करण्यात येऊनही तपास सीबीआयकडे वर्ग झाला नसल्याचा उल्लेख करत त्यांनी या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या तपासातील अनुत्तरित प्रश्न आणि मफलर मॅनची ओळख याबाबतची उत्सुकता कायम आहे.
