Rohit Pawar : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज पुण्यातील युवा संघर्ष यात्रेत कर्जत-जामखेड येथील एमआयडीसीचा मुद्दा उपस्थित करत आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर जोरदार टीका केली. युवा संवाद यात्रेत युवकांना मार्गदर्शन करताना त्यांनी आता युवकांनी संघर्षासाठी तयार राहावे असे सांगितले. आज विजयादशमीनिमित्त पुण्यात युवा संघर्ष यात्रा काढण्यात आली. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत आमदार पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, प्रविण गायकवाड आदी उपस्थित होते.
रोहित पवार म्हणाले, विकासकामांत भेदभाव करण्याची काहीच गरज नाही. माझ्या एमआयडीसीचाच मुद्दा पहा. मी काम करून घेतलं. फायलींवर सह्या घेतल्या. यासाठी मोठा पाठपुरावा केला. मंत्र्यांनाही भेटलो. स्थानिक युवकांना रोजगार मिळावा. रोजगारासाठी त्यांना दुसऱ्या शहरांत स्थलांतर करावे लागू नये हाच हेतू यामागे होता. यामध्ये आम्ही कोणताच भेदभाव केला नाही. मात्र, असे असतानाही काही लोकांना राजकीय द्वेषातून भेदभाव करायचा होता. माझ्याही मतदारसंघात हेच झालं. आधी असं कधीच होत नव्हतं. आधाची राजकीय मंडळी एकमेकांना मदत करत होती. परंतु, आता असं होत नाही असे रोहित पवार म्हणाले.
मराठा आरक्षण अभ्यासाला तेलंगणा निवडणुकीचा फटका; अधिकाऱ्यांमुळे कागदपत्र तपासणीत अडचण
कंत्राटीचा जीआर रद्द केला पण, यात्रा थांबणार नाहीच
राज्य सरकारने आताच कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द केला आहे. तुम्ही एकत्रित आलात त्याचंच हे पहिलं यश तुम्हाला मिळालं. आता काही लोकं म्हणतात की यात्रा रद्द होईल पण तसं काहीच होणार नाही. यात्रा सुरुच राहणार आहे. अडीच लाखांची पदभरतीची जाहिरात काढावी, यांसह आणखीही मागण्या आम्ही यात्रेत करणार आहोत असे आ. पवार म्हणाले.
आज युवकांकडे डिग्री आहे पण काम नाही. स्पर्धा परीक्षा देतात पण जाहिरात निघत नाही. मुलांच्या हाताला काम मिळत नाही याला आपण अन्याय म्हणतो. आज दुष्काळ आहे पण कुणीच चर्चा करत नाही याला म्हणतात अन्याय. आंदोलने होतात सत्ताधाऱ्यांकडून आश्वासने दिली जातात. पण पुढे काहीच होत नाही याला म्हणतात अन्याय. आता याला एकच उत्तर ते म्हणजे संघर्ष. आता आपल्याला संघर्ष करावा लागेल, असे आवाहन रोहित पवार यांनी यावेळी केले.
अधिवेशनात काय होतं. कुणी काहीतरी वक्तव्य करतं. नुसतीच टीका होते. परंतु, पवार साहेबांच्या काळात अधिवेशनात चर्चा होत होती. पण आज काय होतं तर कविता ऐकाव्या लागतात. कविता ऐकून करायचं काय? यातून युवकांच्या हाताला काम मिळणार आहे का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.